‘ते मंतरलेले 6 महिने…’; अशोक मामांसोबतचा ‘तो’ फोटो शेअर करत हेमांगी कवीची खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच २०२३ या वर्षाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत घोषणा केला. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या घोषणनेनंतर सर्व स्तरांवरून अभिनेता अशोक सराफ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक राजकीय मंडळी, कलाकार मंडळी, तंत्रज्ञ, नाट्यकर्मींनी सोशल मीडियाद्वारे अशोक मामांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यामध्ये हेमांगी कवीचा देखील समावेश आहे.

‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर झाल्यानंतर राजकीय नेतेमंडळींपासून ते कलाकार क्षेत्रातील दिग्गज मंडळींपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत अशोक मामांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यामध्ये अभिनेत्री हेमांगी कवीचाही समावेश आहे. हेमांगी कवीने हि पोस्ट अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर करताना यामध्ये तिने अशोक सराफ यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हेमांगीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. यावर अनेक चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

हेमांगी कवीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, ‘महाराष्ट्र भूषण! खूप खूप अभिनंदन भाई! पुरस्कार तुम्हांला मिळालाय पण उर आमचा भरून आलाय! एक अख्खी पिढी तुम्हांला बघत मोठी झालीए आणि अजून ही तुम्हांला पाहीलं की आमच्या काळातला ‘The Superstar’ म्हणून छाती फुगवून घेतोय! एवढ्या ताकदीचं काम करून ठेवलंय तुम्ही! आज तुम्हांला ‘महाराष्ट्र भूषण’ घोषित केलं, आम्हांलाच आनंद झालाय! महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार! २००४ साली तुमच्या सोबत नाटकात काम करायचा बहुमान मला मिळाला होता. अनाधिकृतचे ते मंतरलेले ६ महिने मी कधीच विसरणार नाही!’