‘कळवा स्टेशनवर एक जण माझ्या मानेला…’; हेमांगीने सांगितला ‘तो’ विचित्र प्रसंग


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमांगी कवी ही अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने नाटक, चित्रपट, मालिका आणि वेबसीरिज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रत्येक भूमिकेतून तिने आपल्या अभिनयाचा ठळक ठसा प्रेक्षकांच्या मनावर उठवला आहे. हेमांगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि त्यामुळे अनेकदा ती विविध पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेते. तिचा बिनधास्त अंदाज तिच्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे. नुकतीच नवरात्रोत्सवानिमित्त तिने एका माध्यमाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने केलेली वक्तव्य चर्चेत आहेत.

हेमांगी कवीने नुकतीच एका नामवंत वाहिनीला मुलाखत दिली. ज्यामध्ये तिने स्त्रियांच्या समस्यांविषयीचे स्पष्ट मत मांडले आहेत. यावेळी तिने तिच्या आयुष्यातील एक मोठा अनुभव सांगितला. हेमांगी म्हणाली, ‘सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करताना, सेटवर महिलांना अनेक अनुभव येत असतात. माझ्या सुरक्षेसाठी काहीवेळा मला कायदा हातात घ्यावा लागला. याबद्दल सांगायचं झालं, तर कळवा स्टेशनवर एक जण माझ्या मानेला हात लावून गेला. त्या क्षणाला मी त्याच्या कॉलरला पकडून त्याला एक लगावून दिली’.

‘तो प्रसंग घडल्यावर मी त्या माणसापासून स्वत:चं रक्षण जरुर केलं. पण, पुढे जाऊन मला मी कायदा हातात घेतला याची जाणीव झाली… पण, त्या क्षणाला स्वत:चं रक्षण करणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. माझ्याकडे कोणी वाईट नजरेने पाहिलं तर, मी थेट क्या है… असं विचारते. जिथल्या तिथे जाब विचारल्यावर माणसं लाजतात याउलट काही माणसं निर्लज्जपणे तशीच कृती पुन्हा करतात. पण, यावर गप्प बसणं हा उपाय नाही. मी आधीही पटकन रिअ‍ॅक्ट करून समोरच्याला जाब विचारायचे आताही तेच करते’. यातून हेमांगीने आत्मरक्षणासाठी स्त्रीने कायम खंबीर असणे किती आवश्यक आहे याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले आहे.