‘स्त्रीला स्वत:चं मूल नाही म्हणजे तिचा जन्मच वाया..’; ‘झिम्मा 2’च्या कथेबाबत दिग्दर्शकाने मांडलं स्पष्ट मत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. अजूनही थिएटरमध्ये हा आनंदाचा खेळ रंगतोय. ‘झिम्मा’च्या दुसऱ्या भागात या बायकांच्या रियुनियनची एक सुंदर भावस्पर्शी प्रसंगांसह दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकाने महिलांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक महत्वाच्या गोष्टींवर भाष्य केलंय. यामध्ये दुसरं लग्न, फक्त आई होणं म्हणजे बाई होणं नसतं, मूल न होणं, वाढत्या वयानंतर आलेलं आजारपण आणि त्यानंतरचे आयुष्य या प्रत्येक विषयावर हा चित्रपट भाष्य करतोय.

दरम्यान या चित्रपटात अशा विषयांना अधोरेखित करण्यामागची दिग्दर्शकाची संकल्पना नेमकी काय होती..? असा सवाल केला असता यावर दिग्दर्शक हेमंत ढोमेने प्रतिक्रिया दिली आहे. एका नामवंत वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत बोलताना दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला कि, ‘एखाद्या स्त्रीला मूल न होणं म्हणजे खूप काहीतरी भयंकर या गोष्टी मी स्वत: अनुभवल्या आहेत. स्त्रीला स्वत:चं मूल नाही म्हणजे तिचा जन्मच वाया गेला या सगळ्या गोष्टी आजच्या काळात बोलल्या जातात. ३० वर्षांपूर्वी असे प्रकार होत असते, तर कदाचित आपण समजून घेतलं असतं. पण, आजच्या काळात अशी मानसिकता असणं हे वाईट आहे. कारण, अलीकडच्या काळात मूल होण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यावर आमच्या सिनेमात एक सुंदर वाक्य आहे ते म्हणजे, ”एखाद्या स्त्रीला स्वत:चं मूल नसणं हा सुद्धा एक पर्याय आहे, मूल हवं की नको हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक महिलेला आहे”.’

पुढे म्हणाला, ‘मला वाटलं हा विषय मांडण्याचं हेच एक योग्य माध्यम आहे. आम्ही जेव्हा कथेवर काम करत होतो, तेव्हा क्षिती म्हणाली होती, हा खूपच संवेदनशील विषय आहे त्यामुळे कदाचित अनेकांना हे मत पटणार नाही, आपला प्रेक्षकवर्ग तुटू शकतो. पण, मी सुरुवातीपासून म्हणत होतो… हा भाग कथेत ठेवायचा आणि आपल्या प्रेक्षकांना समजावून, खूप प्रेमाने आपण ही गोष्ट सांगायची. आमच्या दोघांची यावर खूप चर्चा झाली आणि हा भाग मूळ कथेत असणार हे पक्क ठरलं. यानंतर मनालीच्या भूमिकेसाठी शिवानीचं कास्टिंग झालं आणि तिने या भूमिकेला शंभर टक्के न्याय दिला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर हा विषय लोकांनी खूप सुंदर पद्धतीने आपलासा केला हे मला जाणवलं याबद्दल आज मनात प्रचंड आनंद आहे’.