‘6 पानांचा अन् सलग 6 मिनिटांचा सीन..’; ऑनस्क्रीन सासू सुनेच्या ‘त्या’ सीनबद्दल हेमंत ढोमेची खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस तुफान गाजवला आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांनी या चित्रपटाला विशेष पसंती दिली आहे. ‘झिम्मा २’मध्ये अभिनेत्री सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. यांच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर देखील मुख्य भूमिकेत आहे. ‘झिम्मा’नंतर ‘झिम्मा २’मध्ये सोनाली कुलकर्णी आणि मृन्मयी गोडबोलेची जागा शिवानी आणि रिंकूने भरून काढली आहे.

या चित्रपटात शिवानीने सुचित्रा बांदेकरांची भाची ‘मनाली’ आणि रिंकूने निर्मिती यांची सून ‘तानिया’ची भूमिका साकारली आहे. दरम्यान निर्मला आणि तानियाच सासू- सुनेचं खोडकर पण जिव्हाळ्याचं नातं प्रत्येकाला भावलं. या ऑनस्क्रीन सासू- सुनेचे चित्रपटातील अनेक सीन्स चर्चेत आले. याबाबत हेमंत ढोमेने एक खास पोस्ट शेअर केली आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमेने लिहिलंय, ‘ ”झिम्मा २” चित्रपटामध्ये तानिया आणि निर्मलाचा बेडरूम मधल्या भांडणाचा एक वन शॅाट प्रसंग आहे. त्यावेळी सेटवरच्या खोलीत एका कोपऱ्यात मी आपली जागा पकडून बसलो होतो’.

‘कॅमेरात दिसू नये म्हणून एका लाल बॅगेच्या मागे लपून बसलो होतो. ६ पानांचा आणि ६ मिनिटांचा सलग वन शॅाट करायला आम्हाला तर बाई एवढी मज्जा आली, एवढी मज्जा आली की, एवढी मज्जा कधीच कोणाला आली नसेल! माझा मित्र सत्यजीत श्रीराम आणि संपूर्ण टिमच्या मेहनतीशिवाय ही मज्जा येणं शक्य नव्हतं! त्यामुळे माझ्या संपूर्ण टिमचे खूप आभार! याशिवाय निर्मिती सावंत आणि रिंकू राजगुरु या दोघींना खूप प्रेम’. या पोस्टसोबत हेमंतने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो एका ट्रॉली आणि बॅगेआड लपून बसल्याचं दिसत आहे.