जरांगेंच्या उपोषणाबद्दल हेमंत ढोमेचे ट्विट; म्हणाला, ‘.. त्यांच्या न्याय मागणीचा विचार झाला पाहिजे’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. दरम्यान जरांगे यांची प्रकृती प्रचंड खालावली असून राज्यभरातून मराठा आंदोलकांनी आवाज उठवला आहे. सत्त्ताधारी चर्चा करण्यासाठी येत नाहीत हे पाहून मराठी आंदोलक आता आक्रमक होऊ लागले आहेत. मराठवाड्यातील बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये सोमवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने एक ट्विट शेअर केले आहे.

अभिनेता हेमंत ढोमे हा कायम आर्थिक, सामाजिक तसेच राजकीय विषयांवर मुद्देसूद बोलताना दिसतो. आजही त्याने अधिकृत सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून एक ट्वीट शेअर करत आपले मत मांडले आहे. यात त्याने लिहिलंय, ‘आजवर शांततेने, अहिंसेने चाललेले मराठा आरक्षणाचे आंदोलन हिंसक वळण घेतंय… मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय… त्यांच्या न्याय मागणीचा विचार झाला पाहिजे! सरकारने लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत शिवरायांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र अशांत होता कामा नये! जय शिवराय!’.

हेमंत ढोमे यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केवळ हेमंत ढोमे नव्हे तर मराठी सिनेसृष्टीतील आणखी काही कलाकार मंडळींनी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला समर्थन देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हेमंत ढोमेआधी अभिनेता रितेश देशमुखने देखील जरांगे यांच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली होती. शिवाय ‘आई कुठे काय करते’ गेम अश्विनी महांगडेने मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण करणाऱ्या आंदोलकांची भेट घेतली आणि आपला सहभाग दर्शवला आहे. जरांगे यांच्या मागण्यांना सरकार काय उत्तर देणार हे पाहणे आता महत्वाचे आहे.