सरकारी यंत्रणेचा तीव्र निषेध!! मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी अभिनेत्याचा संताप; ट्विट झालं व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील बरेच कलाकार मंडळी हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. केवळ सक्रिय नव्हे तर ही कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयांवर आपापले मत प्रकट करताना दिसतात. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात असताना काही मराठी कलाकारांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

नुतकाच या घटनेचा निषेध करताना मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेने एक संताप व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली होती. यानंतर आता अभिनेता हेमंत ढोमेने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल ट्विटरवर एक संताप व्यक्त करणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये हेमंतने लिहिलं आहे कि, ‘जालन्यात शांततापूर्ण मार्गाने चालणाऱ्या आंदोलकांवर क्रूर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारी यंत्रणेचा तीव्र निषेध!! दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हायला हवी!! आपल्या महाराष्ट्रात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी… राजकारणासाठी हे सारं चिघळता कामा नये!!’

अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच या ट्विटवर अनेकांनी रिट्विट करत संताप व्यक्त केला आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळताना दिसत आहे. जालना येथे २९ ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. त्यांनी उपोषण मागे घ्यावं म्हणून प्रशासनाने केलेले दोन प्रयत्न फसल्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाले. त्यानंतर लाठीचार्जची घटना घडली.