हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याचा बहुप्रतिक्षित ‘जवान’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानसोबत नयनतारा, विजय सेतुपति, प्रियामणि, सान्या मल्होत्रा, रिद्धि डोगरा, लहर खान, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य, सुनील ग्रोवर, संजय दत्त अशी दमदार स्टारकास्ट आहे. तसेच अभिनेत्री दीपिका पदुकोणही महत्त्वाच्या कॅमिओ भूमिकेत आहे. या चित्रपटात शाहरुखचा अलग अंदाज आणि अलग लूक पहायला मिळतोय. ज्याची भुरळ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप याला पडली आहे.
सोनी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता पृथ्वीक प्रताप हा कायम वेगवेगळी पात्र अंगिकारताना दिसतो. अभिनय आणि विनोदाचं एक कमाल समीकरण म्हणजे पृथ्वीक प्रताप. सध्या पृथ्वीक सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. ज्याचं कारण आहे शाहरुखचा ‘जवान’. होय. अभिनेता पृथ्वीक प्रतापने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो अगदी हुबेहूब ‘जवान’मधील शाहरुखसारखा दिसतोय.
या व्हिडिओमध्ये पृथ्वीकने ‘जवान’ सिनेमातील शाहरुख खानच्या लुकसारखा बाल्ड लूक केल्याचे दिसत आहे. इतकेच काय तर यामध्ये त्याने ज्या डान्स स्टेप केल्या आहेत त्या देखील हुबेहूब शाहरुख सारख्याच आहेत. त्यामुळे पृथ्वीकने शाहरुखला तगडं कॉम्पिटिशन दिलंय म्हणायला हरकत नाही. या व्हिडिओसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘जवानच्या पार्श्वभूमीवर हे रील आणि दहिहंडीच्या पार्श्वभूमीवर माझी हंडी म्हणजे माझं टक्कल सादर करतोय’. या व्हिडिओवर MHJ फेम रसिका वेंगुर्लेकरने कमेंट करत लिहिलंय, ‘आमचा एमएचजेचा शाहरुख खान’.