‘अद्वैतला समजणार रुपालीचं सत्य..’; ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत मोठा ट्विस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली. मालिकेचं कथानक आणि मालिकेतील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. आता या मालिकेत एक असा ट्विस्ट येणार आहे ज्याची गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक वाट पाहत आहेत. अखेर तो क्षण आला आहे. लवकरच अद्वैतला रुपालीच्या खऱ्या रूपाविषयी समजणार आहेत. आता रुपालीच सत्य समोर आल्यानंतर अद्वैतची प्रतिक्रिया काय असणार..? हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

रुपालीचं सत्य अद्वैतसमोर कधी येणार.? याबाबत प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. अखेर प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण होणार असून उद्या २४ डिसेंबर २०२३ रोजी हा महाएपिसोड आपल्याला पाहता येणार आहे. आतापर्यंत मालिकेत, नेत्रा आणि इंद्राणीने जंगलात सर्पलिपीच्या अर्थाचं लपवून ठेवलेलं रहस्य रूपालीला नागामुळे समजल्याने आपण पाहिले. त्यानंतर रुपालीला ती विरोचक असल्याची जाणीव झाली. विरोचकाचा सेवक कलियुगात अद्वैतच्या रुपात वावरत असल्याचे समोर आल्यानंतर रूपालीला विरोचकाचं सत्य कसं समजलं..? याबाबत नेत्रा, इंद्राणी आणि शेखर यांना प्रश्न पडला. त्यामुळे आता अद्वैतला आणखी जपायला हवं असं तिघांनी पक्क ठरवलं. त्याचबरोबर रूपालीचं सत्य समोर येण्यासाठी तिघे योजना आखतात.

दरम्यान, अद्वैत नेत्राला विचारतो ‘जर मी विरोचकाचा सेवक होतो तर कलियुगात विरोचक कोण आहे..?’ तेव्हाच नेत्रा ठरवते की आता अद्वैतला सत्य समजायला हवं आणि ती रुपालीबद्दल अद्वैतला पूर्ण माहिती देते. योजनेप्रमाणे नेत्रा, इंद्राणी आणि शेखर हे रूपालीला आपल्या ट्रॅपमध्ये अडकवतात आणि तिला याचा थांगपत्तासुद्धा लागत नाही. आता लवकरच अद्वैतला रूपालीचं खरं रूप समजणार आहे आणि त्यानंतर पुढे मालिकेत येणारे ट्विस्ट पाहण्याजोगे असतील.