बॉलिवूडकरांवर भारी पडलं बायकांचं रियुनियन; ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘सॅम बहादूर’ला ‘झिम्मा 2’ची तगडी टक्कर


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड सिनेमा विरुद्ध मराठी सिनेमा अशी चुरशीची लढत पहायला मिळत आहे. एकीकडे बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूरचा ‘ऍनिमल’ आणि अभिनेता विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’ असे २ तगडी स्टारकास्ट, बिग बजेट सिनेमे रिलीज झाले आहेत. तर या दोन सिनेमांना अभिनेता- दिग्दर्शक हेमंत ढोमेचा ‘झिम्मा २’ हा मराठी चित्रपट चांगलीच टक्कर देतो आहे. ‘झिम्मा २’ बॉक्स ऑफिसवर सुसाट सुरु असल्यामुळे बॉलिवूडचे तगडे सिनेमे समोर असूनही प्रेक्षकांवर रियुनियनचा रंग पसरला आहे.

बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले असतानाही हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या सिनेमांना टक्कर देतोय हे पाहून मराठी सिनेविश्वातील कलाकार मंडळीदेखील सुखावली आहेत. तिसऱ्या यशस्वी आठवड्यातही ‘झिम्मा २’ची टूर सुसाट सुटली आहे. इतकेच नाही तर आता या चित्रपटाचे शोजही वाढवण्यात आले आहेत.

कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. चित्रपटाची टीम थिएटर्सना भेटी देऊन प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रिया घेत आहेत. एकदंरच हसताहसता डोळ्यांत चटकन पाणी आणणारा आणि रडतारडता मनमुराद हसवणारा ‘झिम्मा २’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय हे नक्की.

चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या भरभरून प्रेमामूळे ‘झिम्मा २’ची संपूर्ण टीम आनंदाने भारावून गेली आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमेने प्रेक्षकांचे आभार मानत म्हटले आहे कि, ‘खूप छान वाटतेय. एवढा उदंड, भरभरून प्रतिसाद मिळेल, असे खरोखर वाटले नाही. प्रेक्षक आपले खास दिवस ‘झिम्मा २’बघून साजरे करत आहेत. २-३ वेळा चित्रपट पाहायला आलेले प्रेक्षकही अनेक आहेत. खूप छान वाटतेय. ‘झिम्मा २’ सोबत बॉलिवूडचे काही मोठे सिनेमेही प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे जरा दडपण होते. परंतु आता दोन आठवडे झाले आहेत. प्रेक्षक आजही ‘झिम्मा २’ला पसंती देत आहेत. या चित्रपटांसोबत ‘झिम्मा २’ स्पर्धा करतोय आणि हे भारी फीलिंग आहे’.