‘झिम्मा 2’ चित्रपटाचे अर्धशतक!! दिग्दर्शक हेमंत ढोमेने व्यक्त केला आनंद; म्हणाला, ‘आमच्या काळजाचा तुकडा..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या चित्रपटाच्या कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ५० दिवसांनंतरही चित्रपटगृहात ‘झिम्मा २’ हाऊसफुल्ल चालतोय. प्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी अर्धशतक पूर्ण केले आहे.

कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘बाईपण भारी देवा’नंतर जिओ स्टुडिओजचा हा 2023 मधील दुसरा यशस्वी मराठी चित्रपट आहे. ‘झिम्मा २’ ला मिळालेल्या प्रेमाबद्दल हेमंत ढोमे म्हणतात, SUPERDUPER HIT 50 DAYS! झिम्मा हा सिनेमा आमचा राहिला नाही, तो तुमचा झाला… त्याचा पुढचा भाग म्हणजे झिम्मा २ तर तुम्ही आधीपेक्षाही जास्त मोठा केलात…’

‘तुम्ही त्याचा सोहळा केलात… आमच्या काळजाचा तुकडा अतिशय प्रेमाने आपला केलात त्याबद्दल तुमचे शतशः आभार! झिम्मा २ चा हा प्रवास एखाद्या जादूपेक्षा कमी नव्हता. प्रेक्षकांना प्रत्येक पात्राशी जोडण्याचा आणि ही कथा सगळ्यांना आपलीशी वाटावी, हा आमचा प्रयत्न यशस्वी ठरला. आज ५० दिवसांचा गाठलेला टप्पा आणि त्याच्या उत्सवाचा दिवस आहे. हा उत्सव केवळ ‘झिम्मा २’ चा नसून आपल्या सर्वांचा आहे. प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी ‘झिम्मा २’ ची संपूर्ण टीम मनापासून आभारी आहे’.