हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जितेंद्र जोशी हा मराठी कला विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे. मालिका, नाटक, चित्रपट, वेब सीरिज अशा विविध मनोरंजन क्षेत्रात त्याने नेहमी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. याशिवाय जितेंद्र एक उत्तम कवीदेखील आहे. अत्यंत मार्मिक पद्धतीने एखाद्या विषयाची अगदी सहज मांडणी करण्यात जितेंद्रचा हातखंडा आहे. त्यामुळे प्रत्येक माध्यमात त्याचे चाहते आहे. दरम्यान जितेंद्रच्या या यशामागे त्याच्यासोबत कायम खंबीर उभी राहणाऱ्या पत्नीसाठी त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी व्हायरल होतेय.
नुकताच जितेंद्र जोशीच्या लग्नाचा १४ वा वाढदिवस झाला. यानिमित्त त्याने पत्नीसोबतचा एक खास फोटो शेअर करत एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यासोबत कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय कि, ‘खरंच. १ लाख २२ हजार ६४० तास, ५११० दिवस आणि १४ वर्ष. मला अजूनही आठवतंय की कोणीतरी सांगितले होते की हे वर्षभरही चालणार नाही. मला त्या सर्वांबद्दल खूप वाईट वाटते कारण मी किंवा आपण किंवा ते आपल्यासाठी निर्णय घेत नाहीत, तर देव आणि एक पवित्र ऊर्जा आहे. माझा असा विश्वास आहे की, एक व्यक्ती म्हणून आपण वेगवेगळ्या कारणांनी बदलत राहतो. पण आपला आत्मा तसाच राहतो. कुठेतरी, कधी कधी आपण कोणाकडून काहीतरी मागतो किंवा शोधतो’.
पुढे लिहिलंय, ‘कधी कधी आपण एकमेकांपासून खूप दूर जातो किंवा इतके जवळ येतो की आपण एकमेकांना पाहूही शकत नाही. परंतु ही कर्मशक्ती आहे, जी एका हेतूसाठी कार्य करत आहे. कदाचित तू मला चांगला माणूस बनवणं, हाच मला भेटण्याचा उद्देश आहे. कारण एक चांगला माणूस होण्यासाठी मला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. या कडू ते चांगल्या प्रवासासाठी धन्यवाद. धन्यवाद मिताली.. तुला अधिक यश आणि आनंद मिळो. लग्नाच्या १४ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा’. असे लिहीत जितेंद्र जोशीने मितालीचे आभार मानले आहेत. जितेंद्रची पत्नीदेखील चित्रपट आणि नाटकांचे लेखन करते. त्याचसोबत तिने काही नाटकांचे दिग्दर्शनदेखील केले आहे.