‘बाळ माझं मोठं होतंय..’; लाडक्या लेकीच्या वाढदिवशी जितेंद्र जोशीची भावनिक पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता जितेंद्र जोशी हा त्याच्या दमदार अभिनय प्रदर्शनामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज अशा विविध माध्यमातून जितेंद्र जोशी नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकत असतो. शिवाय तो एक उत्तम लेखक- कवी आहे. त्याच्या कविता आणि कवितांचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. मात्र आज जितेंद्रने त्याच्या लाडक्या लेकीसाठी तिच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आज अभिनेता जितेंद्र जोशीच्या लाडक्या लेकीचा म्हणजेच रेवाचा वाढदिवस आहे आणि यानिमित्त त्याने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. जितेंद्र जोशीने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर रेवाच्या जुन्या फोटोंचा एक कोलाज व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने रेवाच्या लहानपणीची एक गोड झलक दाखवली आहे. सोबत कॅप्शनमध्ये जितेंद्र जोशीने लिहिलंय, ‘बाळ माझं मोठं होतंय..
कुमुदिनी काय जाणे तो परिमळ। भ्रमर सकळ भोगीतसे॥
तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम। आम्हीच तें प्रेमसुख जाणों॥ – तुकोबाराय’

‘बघता बघता 13 गेली सुद्धा !! परमेश्वराची कृपा असल्याशिवाय काहीच शक्य नाही हे दर दिवशी या मुलीला पाहताना वाटतं. तिला मिळालेली स्वतंत्र बुद्धी, निरागस हास्य आणि अशक्य जिज्ञासू वृत्ती कायम तिच्या सोबतीला असू देत. संतांच्या अभंगांचा स्पर्श विवेकाला होऊ देत आणि आरतीप्रभू म्हणतात त्याप्रमाणे कवितेतील, जगण्यातील, स्वतः आणि इतरांमध्ये असलेल्या विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडू देत. बाकी काही असेल, नसेल तरी ठीक परंतु स्वतः शी छान मैत्री होऊ देत’. जितेंद्र जोशींच्या या सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी आणि त्याच्या मित्र मैत्रिणींनी रेवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच जितेंद्रने आपल्या लेकीसोबत परदेशवारी देखील केली होती आई तेव्हाही एक पोस्ट शेअर केली होती. जी व्हायरल झालेली.