इर्शाळवाडीतील आपत्तीग्रस्थांना जुई गडकरी मदत पोहचवणार; पोस्ट शेअर करत म्हणाली..


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने प्रचंड जोर धरल्याचे दिसून आले आहे. दरम्यान बुधवारी रात्री रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्याजवळील इर्शाळवाडी गावात भूस्खलन झाले आणि या दुर्घटनेत गावातील २५ ते ३५ घरे माती, दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून १०० ते १५० लोक अजूनही या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान इर्शाळवाडी आपत्ती ग्रस्थांच्या मदतीसाठी अभिनेत्री जुई गडकरीने पुढाकार घेतला आहे.

अभिनेत्री जुई गडकरीने अलीकडेच या संदर्भात पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले होते. यानंतर आता तिने ग्रामस्थांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. जुईची टीम इर्शाळवाडीतील नागरिकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवणार आहे. यासंदर्भात माहिती देणारी पोस्ट शेअर करत तिने लिहिले आहे कि, ‘इर्शाळवाडीसाठी मदत पाठवायची असल्यास कृपया मला मेसेज करा. पंचे, चादरी, औषधे, कपडे, चपला, जेवण इत्यादी जीवनावश्यक वस्तू इर्शाळवाडीपर्यंत माझ्या टीमकडून पोहोचवल्या जातील…’

अभिनेत्री जुई गडकरीने काही महिन्यांपूर्वी आपल्या कुटुंबासोबत इर्शाळगडाला भेट दिली होती. यावेळी जुईने येथील स्थानिक ठाकर लोकांची भेट घेतली. इतकंच नव्हे तर त्यांच्या घरात जेवली होती त्यांच्या हातची चव चाखली होती. त्यामुळे ही दुर्घटना घडल्यावर जुईने दुःख व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने इर्शाळवाडी गावात वीज आणि मेडिकलची सुविधा नसल्याचे म्हटले होते. अखेर तिने आता आपत्तीग्रस्त ग्रामस्थांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.