हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘लावण्यवती’ या अल्बममधील ‘ गणराया’, ‘करा ऊस मोठा’, ‘लावा फोन चार्जिंगला’ या तीनही गाण्यांना संगीतप्रेमींना प्रचंड प्रतिसाद दिला. यानंतर आता ‘लावण्यवती’ अल्बममधील ‘काटा किर्र’ हे अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘लावणी नाही… कापणी’ या टॅगलाईनप्रमाणे या गाण्यातूनही आपल्या लोककलेचे दर्शन घडणार आहे. त्यामुळे या गाण्याबाबत प्रेक्षकांमध्ये फारच उत्सुकता पहायला मिळते आहे.
अवधूत गुप्ते यांनी शब्दबद्ध केलेल्या आणि संगीत दिलेल्या ‘काटा किर्र’ या गाण्याला मुग्धा कऱ्हाडेच्या ठसकेबाज आवाज लाभला आहे. तर अभिनेत्री पूर्वा शिंदेच्या बहारदार नृत्याला ऋषी देशपांडेची साथ लाभली आहे. त्यामुळे यात अधिकच रंगत आली आहे. ‘काटा किर्र’चे नृत्य दिग्दर्शन ‘सुंदरीकार’ आशिष पाटील यांचे असून चैतन्य पुराणिक यांनी याचे छायाचित्रीकरण केले आहे. या गाण्याचा प्रोमो आल्यापासून हे गाणं चर्चेत होतं. अखेर २६ डिसेंबर २०२३ रोजी हे लाजवाब गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
‘लावण्यवती’ या बहारदार गीतांच्या सुरेल अल्बमबद्दल बोलताना गायक अवधूत गुप्ते म्हणाले कि, ‘आपल्या महाराष्ट्राची लोककला जपली पाहिजे. यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो आणि म्हणून तुमच्यासाठी ”लावण्यवती” या अल्बममधील ”काटा किर्र” हे चौथे आणि शेवटचे गाणे तुमच्या भेटीला येत आहे. हे गाणे धमाल उडवून देणारे आणि प्रत्येकाला आवडेल अशी आहे’. सध्या या गाण्याला रसिक प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.