हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे हे मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत प्रसिद्ध नाव आहे. लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता म्हणून केदार शिंदेंची ख्याती आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा त्यांचे आजोबा शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटातून शाहिरांची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर उलघडण्यात आली आहे. आज शाहीर साबळे यांचा जन्मदिवस आणि या निमित्ताने केदार शिंदेंनी आपल्या मनातली खंत व्यक्त केली आहे. त्यांची सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
केदार शिंदे यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर त्यांचे आजोबा शाहीर साबळेंच्या जन्मदिनानिमित्त शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, ‘बाबा.. शाहीर साबळे.. ३ सप्टेंबर हा तुमचा जन्मदिवस. आज जन्मशताब्दी वर्षाची सांगता होईल. मी २०१९ मध्ये जे ठरवलं ते स्वामी कृपेने पुर्ण झालं. तुमच्या आयुष्याचं documentation झालं. प्राईम व्हिडीओला आज “महाराष्ट्र शाहीर” सिनेमा उपलब्ध आहे. पुढच्या कित्येक पिढ्या तुम्हाला विसरणार नाहीत याची खबरदारी घेतली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, संजय छाब्रिया, अंकुश चौधरी यांच्या मदतीने हे शक्य झालं. शासनाने तुमची दखल गांभीर्याने घेतली नाही याचं शल्य आयुष्यभर मनात राहील. पण कुणावर का अवलंबून रहायचं..? याची शिकवण याच काळात मिळाली. मी पुढे दिग्दर्शक म्हणून कसा आहे..?? हे सांगणं मला अवघड असलं तरी, मी शाहीरांचा नातु म्हणून कसा आहे..? याविषयी लोकं भरभरून बोलतील याची खात्री आहे..’
पुढे लिहिलंय, ‘माझ्या आजोबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं..? यासाठी एक सिनेमा पाहिला तरी समजून येईल.. माझी नातवंड जेव्हा विचार करतील की, आपल्या आजोबांनी काय केलं..? त्यांच्यासाठी बस्स एक तुमचा सिनेमा पाहिला तरी खुप झालं!!!’ या पोस्टवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिलंय, ‘केदार सर शाहिरासारखे आजोबा मिळाले हे तुमचं जितकं भाग्य तितकंच शहारांनाही अभिमान होत असेल तुम सारखा नातू लाभला. श्री स्वामी समर्थ!’ अन्य एकाने लिहिलंय, ‘अलौकिक प्रतिभेचे धनी, आजच्या आमच्या पिढीतल्या लोकांना फारसे त्यांच्याबद्दल माहिती नव्हती पण हा चित्रपट पाहून त्यांच्या अफाट कर्तृत्वाची जाणीव झाली केदार सर तुम्हालाही धन्यवाद हा चित्रपट काढल्यासाठी’