हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार. म्हणजेच आजचा दिवस दोस्तांचा दिवस. ‘जागतिक मैत्री दिवस’. आज जगभरात मित्र मैत्रिणी एकमेकांसोबत हा मैत्री दिन साजरा करतात. आयुष्यात मित्र हेसुद्धा आपलं कुटुंब असतं. सुख दुःखात जसे नातेवाईक असतात तसेच मित्र मैत्रिणी सुद्धा असतात. आपले काही जिवलग मित्र हे आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात असतात. असेच मित्र सेलिब्रिटी मंडळींच्याही आयुष्यात आहेत. तर आज या खास दिवसानिमित्त अनेक कलाकार मंडळीदेखील सोशल मीडियावर आपल्या मित्र आणि मैत्रिणीसोबतचे फोटो, व्हिडीओ तसेच विविध आठवणी शेअर करत आहेत.
मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनीदेखील आजच्या मैत्री दिवसाचे औचित्य साधत काही खास फोटो शेअर केला आहे. केदार शिंदे आणि अंकुश चौधरी, भरत जाधव, संजय नार्वेकर यांची २० ते २५ वर्ष जुनी अशी घट्ट मैत्री आहे हे आपण जाणतोच. तर त्याच काळातील जुन्या आठवणींना उजाळा देत केदार शिंदेनी हा खास फोटो शेअर केला आहे. सोबत आपल्या चाहत्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोसोबत त्यांनी एक कॅप्शन लिहीत गंमत केली आहे.
केदार शिंदेंनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘काही गोष्टींची सुरूवात करताना आपल्यासोबतचे सवंगडी आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. माझ्या आयुष्यातील हीच ती लोकं…कोण कोण आहेत..? ओळखलंत तर कमेंट्समध्ये सांगा’. तसेच केदार यांनी हा फोटो आपल्या मित्रांना टॅग केला आहे. या फोटोवर अनेक नेटकरी कमेंट करत फोटोतील प्रत्येकाची ओळख सांगत आहे. अनेकांनी या फोटोत कोण कोण आहे ते अचूक ओळखले आहे. तर केदार शिंदेंनी शेअर केलेल्या या जुन्या फोटोमध्ये आपण अरुण कदम, भरत जाधव, अंकुश चौधरी, संतोष पवार, जयराज नायर या मराठी कलाकारांना पाहू शकतो.