‘मैत्रीण, बायको आणि वेळप्रसंगी आई…’; पत्नीच्या वाढदिवशी केदार शिंदेंची भावनिक पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृतींमधून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ‘जत्रा’, ‘अगं बाई अरेच्चा’, ‘बाईपण भारी देवा’ यांसारख्या त्यांच्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांचा दर्जा काही औरच आहे. आज केदार शिंदे हे नाव यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक असले तरीही इथपर्यंत येण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत फार मोठी आहे. त्यांच्या पडत्या काळात त्यांना पत्नी बेलाची मोठी खंबीर साथ लाभली आणि याचे श्रेय देत आज पत्नीच्या वाढदिवशी केदार यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

केदार शिंदे यांच्या पत्नी बेला शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि यानिमित्त दिग्दर्शकाच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बायको बेलासोबतचे फोटो शेअर केले आहेत. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले कि, ‘हा फोटो exactly उलट हवा होता. कारण, तू पाठीशी खंबीरपणे उभी होतीस म्हणून मी काहीतरी करू शकलो. तुझं माझ्या आयुष्यात येणं ही स्वामी कृपा. चांगल्या वाईट दिवसात, मिळेल ते स्वीकारत गेलीस. माझ्या कला आयुष्यातील चढ-उतार हे तू जास्तच भोगलेस’.

पुढे लिहिलंय, ‘५१ वर्षे होतायत पण, तू माझी मैत्रीण, बायको आणि वेळप्रसंगी आई झालीस. खूप काही केलंस, करतेस आणि करशीलच याची खात्री आहे. वाढदिवस शुभेच्छा बेला शिंदे स्वामी कृपेने उत्तम होवो’. केदार शिंदे यांची हि पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत असून या पोस्टवर नेटकरी बेला शिंदे याना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना दिसत आहेत. यामध्ये अनेक चाहते आणि कलाकार मंडळींचा देखील समावेश आहे.