‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला 2 महिने पूर्ण; केदार शिंदे म्हणाले, ‘सहा लक्ष्मींच्या पावलाने..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातून स्त्रियांच्या आयुष्यातील लहान मोठ्या गोष्टी अत्यंत सुंदर पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. या चित्रपटात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या सहा अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. तब्बल ७५ कोटींपेक्षा जास्त या चित्रपटाच्या कमाईचा आकडा आहे. गेल्या दोन महिन्यात मिळालेल्या प्रेमाबद्दल केदार शिंदेंनी एक पोस्ट शेअर केली आहे.

गेले दोन महिने बॉक्स ऑफिसवर ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट धुमाकूळ घालतो आहे. या चित्रपटाला मिळालेलं यश हे चित्रपटाच्या टीमचे आहे आणि याबाबत वारंवार केदार शिंदे बोलताना दिसले आहेत. आज चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर २ महिने पूर्ण करताना प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल केदार शिंदेंनी खास पोस्ट शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत. तसेच चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे. मुख्य भूमिकेत असणाऱ्या ६ अभिनेत्रींसोबतचा एक फोटो शेअर करत त्यांनी हि पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये केदार शिंदेंनी लिहिलंय, ‘काल बाईपण भारी देवा सिनेमा प्रदर्शित होऊन २ महिने पूर्ण झाले. या दोन महिन्यांत खूप काही मिळालं. तुम्हा रसिकांच्या मनात घर करता आलं यापेक्षा अहो भाग्य ते काय दुसरं? या सहा लक्ष्मींच्या पावलाने चित्रपटगृहात गर्दी सुरू झाली आणि त्यानंतर चित्रपटगृह तुडुंब भरून वाहतायत. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने घवघवीत यश या सिनेमाला लाभलं. मी या सगळ्याचा एक भाग आहे यापेक्षा आनंद तो काय? अजूनही काही ठिकाणी सिनेमा सुरू आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात मंगळागौरीचे फेर धरले जातायत. सहा लक्ष्मींच्या साड्या दागिने याचे ट्रेन्ड सर्वत्र दिसून येतायत. श्री सिद्धिविनायकाचा महाप्रसाद मिळाला. पुढे नवं काम करताना जबाबदारीची जाणीव सतत होत रहाणार. चांगलंच देण्याचा प्रयत्न असेल’.