केतकी चितळेचा मराठा योद्धा जरांगे पाटलांवर निशाणा; म्हणाली, ‘मुखवटा फार काळ टिकत नाही..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यात सर्वत्र जातीय सर्वेक्षण सुरु आहे. यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करत आहेत. यांपैकी एक महिला कर्मचारी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी काम करत असताना अभिनेत्री केतकी चितळे त्यांच्यासोबत हुज्जत घालताना दिसली. यावेळी तिने आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्यदेखील केली. पालिकेच्या महिला कर्मचाऱ्यास जाब विचारताना केतकीने अ‍ॅट्रॉसिटीवरून टोमणा देखील मारला. इतकेच काय तर मी मराठा नाही तर चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे, असे बोलताना दिसली.

दरम्यान, ‘संविधान आणि कायदा सर्वांसाठी समान नाही. जातींवर आधारित कायदे बनवले जात आहेत’. अशी काही वक्तव्य केतकीने केली होती. ज्यावरून तिला ट्रोल करण्यात आले. अशातच आता तिने मराठ्यांच्या हक्कासाठी लढत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या एका वक्तव्यावर पोस्ट शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील म्हणाले होते कि, ‘धनगर आणि मुस्लीम बांधवांनी मागणी केल्यास त्यांच्याही आरक्षणासाठी मी लढा देईल. मग बघतो सरकार कसं आरक्षण देत नाही त्यांना’.

मनोज जरांगे पाटलांच्या या वक्तव्यावर अभिनेत्री केतकी चितळेने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. यातून जरांगे पाटलांवर तिने टीका करताना लिहिलं आहे कि, ‘आता कसे, खरे रूप दिसले. मुखवटा फार काळ टिकत नाही. यांना फूट पाडायची आहे सनातनींमध्ये. आता तरी जागे व्हा’. केतकीने शेअर केलेली ही पोस्ट आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरू लागली आहे. या पोस्टनंतर अनेक नेटकऱ्यांनी केतकीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आता या वक्तव्याचा केतकीवर काय परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे आहे.