‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप; उद्या प्रदर्शित होणार शेवटचा भाग


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ या लोकप्रिय वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम कायम चर्चेत असतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते हे वेगवेगळ्या पाहुण्यांना धारदार प्रश्नांनी गार करताना दिसतात. या कार्यक्रमाचे तिसरे पर्व सध्या सुरु आहे. या पर्वाला प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळत असताना आता हे पर्व प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या शोच्या आधीच्या दोन पर्वांनाही प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळाला होता.तिसऱ्या पर्वात अनेक दिग्गज मंडळी येऊन गेली. पण आता निरोपाची वेळ आली आहे. याबाबत अवधूतने पोस्ट शेअर केली आहे.

अवधूत गुप्तेंचा ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याबाबत सांगताना अवधूत गुप्तेने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये अवधूतने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमासाठी मेकअप करत तयार होताना दिसत आहे. मग तो शोच्या मंचावर जाऊन पूजा करताना, नारळ फोडताना दिसतोय. यावेळी कार्यक्रमाच्या बॅकस्टेजची कलाकार मंडळीदेखील दिसत आहेत. अवधूतने हा व्हिडीओ शेअर करताना शोचा शेवटचा भाग रविवारी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.

या व्हिडिओसोबत ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या अवधूत गुप्तेने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘थोडे विसरावे लागते .. आठवण्यासाठी .. दूर जावे लागते पुन्हा भेटण्यासाठी!! ह्या पर्वाचा शेवटचा भाग.. येत्या रविवारी!!’. यानुसार, येत्या रविवारी १७ सप्टेंबर २०२३ रोजी म्हणजेच उद्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. आतापर्यंत या कार्यक्रमात राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, उर्मिला मातोंडकर, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, डॉ.अमोल कोल्हे, समीर वानखेडे, श्रेयस तळपदे, सई ताम्हणकर, वंदना गुप्ते, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, अभिजीत बिचुकले ही मंडळी सहभागी झाली होती. यानंतर आता येत्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे सहभागी होणार आहेत.