पिच्चर आल्यावर काय हुईल..? शाहरुखच्या ‘जवान’साठी मराठी अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला, ‘लै आतुरतेने वाट बघतोय..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांचीज उत्सुकता वाढवली आहे. विशेष करून शाहरुखचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. शाहरुख चाहत्यांबद्दल बोलायचं तर यामध्ये मराठी कलाकारांचा देखील समावेश आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीतसुद्धा या चित्रपटाची चर्चा सुरु असताना मराठी अभिनेता किरण माने यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर करत शाहरुख खानच्या अभिनयाचे तोंडभर कौतुक केले आहे. सोबतच ‘जवान’ चित्रपट पाहण्यासाठीची उत्सुकतादेखील यातून त्यांनी व्यक्त केली आहे.

हि पोस्ट शेअर करताना किरण माने यांनी लिहिलं, ”’बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर!” अग्ग्गाय्यायायाया… अख्ख्या देशानं घरात बसल्या- बसल्या शिट्ट्या वाजवल्यात भावा! पिच्चर आल्यावर काय हुईल शारख्या..? तू हायेसच भन्नाट, जबराट, नादखुळा तुझ्यावर जळनार्‍यांनी लै अफवा पसरवल्या दोस्ता, पन तू मागं हटला नाहीस. ट्रोलर्सच्या झुंडीनं तुला लै ट्रोल केला, लै हेटाळनी केली, पन तू भिडलास, नडलास, जिंकलास. तुझ्या पोराला अडकवून तुला झुकवन्याचा प्रयत्न झाला, पन तू तर ‘‘बाजीगर’’! गप र्‍हावून बाजी पलटलीस. परत ताठ कण्यानं, उंच मानेनं उभा र्‍हायलास. भक्कम. पाय रोवून. तुझी ती ‘’क़ातिल’’ नजर रोखून. आजबी तुझ्या ‘‘मन्नत’’पुढं रोज अख्ख्या भारतातनं तरूण पोरंपोरी येऊन उभी र्‍हात्यात… तासनतास तुझ्या घराकडं बघत बसत्यात… त्यांना तुझ्या जातीधर्माशी घेनंदेनं नसतं. कारन ते तुझ्यासारखेच ‘’अस्सल’’ भारतीय असत्यात. तुझी एक झलक दिसली तर आनंदानं नाचायला लागत्यात… येडी होत्यात. जगातला सगळ्यात लोकप्रिय कलाकार हायेस तू. तू फक्त अभिनयातला बादशाह नाहीस, तर ‘मानूस’ म्हनूनबी तू ‘किंग’ हायेस!’

‘ॲसिड ॲटॅक झालेल्या हजारो महिलांची आयुष्य उभी करून दिलीयस तू. नानावटी हाॅस्पीटलमध्ये लहान मुलांच्या कॅन्सरसाठी तू जो वाॅर्ड उभा केलायस त्यानं कित्येक चिमुरड्यांचे जीव वाचवलेत. तुझ्या अशा लै लै लै समाजोपयोगी कामांची जगभर दखल घेतली गेली हाय. युनेस्को अवाॅर्ड मिळवलंयस. साऊथ कोरीयापास्नं इंग्लंडपर्यन्त अनेक देशांनी यासाठी तुला सन्मानित केलंय. त्यासाठी या देशातल्या प्रत्येक सच्च्या नागरीकाला तुझा अभिमान वाटतो! ‘‘पठाण’’च्या वेळी याच आपल्या खर्‍या देशानं दाखवून दिलं की, थयथयाट करत सेलिब्रिटींना शिवीगाळ करणार्‍या छितपूट ट्रोलर्सच्या पलीकडं, बहुसंख्य जनता आहे जी शांत असते, पन मानवतेच्या प्रसारासाठी निधड्या छातीनं लढनार्‍यांच्या पाठीशी भक्कम उभी असते. पठाण सिनेमा म्हनून लै बरा नव्हता. तुझ्या ट्रोल्सना सनसनीत उत्तर म्हनून पब्लीकनं डोक्यावर घेतला. द ग्रेट, वन ॲन्ड ओन्ली शाहरूख खान, आता येणारा ‘‘जवान’’ मात्र लै भारी असनार. लै आतुरतेनं वाट बघतोय. ये लवकर भावा… होऊ दे जाळ न् धूर संगट… चिखलात धुरळा, पान्यात आग काढ… आम्ही आहोत तुझ्यासोबत. बघनार. ‘‘पठाण’’सारखा परत परत बघनार. लब्यू भावा’.