हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता किरण माने हे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या माध्यमातून ते वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होताना दिसतात. अनेकदा आपल्या कामाचे अपडेट आणि वैयक्तिक आयुष्यातील वेगवेगळे अनुभव ते विविध पोस्टच्या माध्यमातून शेअर करताना दिसतात. आताही त्यांनी वैयक्तिक आयुष्यात आलेला एक भन्नाट अनुभव शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी राजगृहाबाहेर भेटलेल्या एका नवविवाहीत जोडप्याबद्दल लिहिलं आहे. किरण मानेंनी या पोस्टमध्ये त्या जोडप्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.
या फोटोसोबत त्यांनी लिहिलंय, ‘… एक लै भारी घटना घडलेली तुमच्याशी शेअर करावी वाटतीय. राजगृहासमोर उभा होतो. तिथं नेहमी अनेक लोक राजगृहाच्या कुतुहलानं जमा झालेले असतात. तिथं मला बघितल्यावर “जय भीम किरण माने सर… एक सेल्फी द्या ना प्लीज” असं म्हणत गर्दी जमा व्हायला लागली… एक नवविवाहित जोडपं मागं घुटमळत होतं. सगळ्यांचे सेल्फी झाल्यावर त्यातला मुलगा माझ्याजवळ आला. म्हणाला, “सर, आम्हा दोघांना सेल्फी आणि आशिर्वाद द्या.” मग मला कळलं की, दोन दिवस आधीच त्यांचा मंगल परीणय झाला होता. नवरी मुलगी पयल्यांदाच मुंबैला आली होती. तिची लै इच्छा होती की आपण सहजीवन सुरू करताना आधी जोडीनं ‘राजगृहा’चं दर्शन घ्यायचं’.
पुढे लिहिलंय कि, ‘संसार सुरू करण्यापुर्वी, जिथं बाबासाहेब – रमाई जोडीच्या वास्तव्याचा दरवळ आहे, तिथं दोघांनी मिळून तो अनुभवायचा!!! म्हणून तो तिला तिथे घेऊन आला होता. कस्लं भारीय हे भावांनो… कस्लं रोमॅंटिक!!! लै मस्त वाटलं. पंचवीशीतल्या त्या जोडीला आत्ता या वास्तूचं महत्त्व कळतंय… म्हणजे यांची पुढची पिढी आपल्या महामानवांच्या संघर्षाविषयी सजग असणार यात शंकाच नाही. दोघांनाबी अगदी मनापास्नं सदिच्छा आणि काळजाच्या तळापास्नं लै लै लै प्रेम दिलं… ‘राजगृहा’त येणं अशा पद्धतीनं ‘साजरं’ झाल्याच्या समाधानात मी परतीच्या प्रवासाला निघालो…’. किरण मानेंची ही पोस्ट व्हायरल होत असून यावरून अनेक नेटकरी ‘जय भीम’ अशा कमेंट्स करताना दिसत आहेत.