‘दोन वर्षांपूर्वीचा तो दिवस…’; अभिनेत्याने शेअर केला ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा भावस्पर्शी किस्सा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता किरण माने केवळ अभिनयामूळे नव्हे तर त्यांनी शेअर केलेल्या वेगवेगळ्या पोस्टमुळे कायम चर्चेत येत असतात. आपल्या पोस्टच्या माध्यमातून मनोरंजन सृष्टिशी संबंधित, राजकीय, सामाजिक विषयांवर मत मांडताना दिसतात. इतकंच नव्हे तर, अनेकदा ते स्वतःचे अनुभव आणि शूटिंग दरम्यानचे किस्सेसुद्धा शेअर करतात. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील हि भूमिका ते साकारत होते. तेव्हाच्या शूटिंग दरम्यानचा एक खास हृदयाला स्पर्शून जाणारा किस्सा त्यांनी शेअर केला आहे.

किरण मानेंनी आपल्या पोस्टमध्ये एका लहान मुलासोबतचा सेल्फी शेअर केला आहे. सोबत लिहिलंय, ‘फेसबुकच्या मेमरीतनं अचानक हा फोटो वर आला… दोन वर्षांपूर्वीचा तो दिवस जसाच्या तसा डोळ्यापुढं आला ! एS आपल्या हितल्या शेतातल्या बंगल्यात ‘मुलगी झाली हो’ सिरीयलचं शुटींग सुरू झालंय…” असं वरडत पंचवीस तीस लहान पोरंपोरी जमा झाली. … कलाकारांसोबत सेल्फी काढायला कुनी आईचा, कुनी बापाचा मोबाईल आनलेला. लै उत्साहात सेल्फी काढनं सुरू झालं… माझं थोडं दूर लक्ष गेलं… एक पोरगं उदास चेहरा करून लांबून बघत बसलंवतं.. त्याच्याकडे बघून ते पोरगं गरीब शेतमजूर कुटूंबातलं असावं हे कळत होतं.. बहुतेक त्याच्याकडं मोबाईल नव्हता. शुटिंगच्या गडबडीत होतो, पन तो चेहरा माझ्या लक्षात र्‍हायला’.

पुढे लिहिलंय, ‘…पॅकअप झाल्यावर, घरी निघताना ते पोरगं तिथंच लांब बांधावर बसलेलं दिसलं. चेहर्‍यावरची उदासी तशीच होती. मी त्याच्याकडं बघून हात हलवला. चेहरा खुलला गड्याचा. त्यानंबी हात हलवला.. मी गाडीत बसून स्टार्टर मारल्यावर त्यानं न रहावून हाक मारली, “ओ विलास पाटील काकाSS”… मी गाडी थांबवली. पोरगं धावत आलं. म्हन्लं, “मला फोटू काढायचाय तुमच्याबरोबर.” म्हन्लं, “मोबाईल कुठंय?” तर म्हन्ला ,”न्हाय माझ्याकडं.. तुमच्या मोबाईलमध्ये काढा की..” मी माझ्या मोबाईलमधी हा फोटो क्लीक केला. खाली उतरून त्याला भेटस्तोवर ते पोरगं लै लै लै खूश होऊन हसत पळत सुटलं घरी… त्याचा हसरा चेहरा बघून जे समाधान वाटलं त्याला मोल न्हाई भावांनो!’