‘मुंबै बापासारखी तर सातारा आई…’; जन्मभूमीसाठी किरण मानेंची ऊर भरून यावा अशी पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका विश्वातील अजिंक्य तारा आणि बिग बॉस मराठी सीजन ४ शोमधील सातारचा बच्चन नुसतं एव्हढं म्हटलं तरी आपण किरण मानेंबद्दल बोलतोय हे लगेच कुणीही सांगेल. असं एक वेगळं विश्व किरण माने यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर निर्माण केलं आहे. बिग बॉसच्या घरातून त्यांनी आपल्या व्यक्तिमतवाची एक वेगळीच छाप पाडली आणि मग काय..? किरण मानेंचा चाहता वर्ग दुप्पटीने वाढला. किरण माने अनेकदा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करून लक्ष वेधून घेतात. आज ते आपल्या जन्मभूमीविषयी लिहिताना भावनिक झाले आहेत.

किरण माने हे सातारा जिल्ह्यातील मायणी गावचे रहिवासी आहेत. कामानिमित्त मुंबई- पुणे- सातारा करताना कितीही दमछाक झाली तरीही मूळ जन्मभूमी आपण सोडणार नाही असे सांगताना त्यांनी हि पोस्ट शेअर केली आहे. किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘…लोकं म्हन्त्यात “सारखं शुटिंगसाठी मुंबई-सातारा-मुंबई.. कशाला यवढी दगदग करत असता? मुंबईत शिफ्ट व्हा की फॅमिली घेऊन. खरंतर मुंबै लै आवडती. नाटका-सिनेमात रमनारी ! जगातलं हे एकमेव शहर असं आसंल, जिथं रोज, कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्यातरी नाटकाचा प्रयोग अस्तो. कुठं ना कुठं, कस्लं ना कस्लंतरी शुटिंग सुरू आस्तं. कस्लं भारीय हे! पन सातारा म्हंजी काळजाचा तुकडा हाय आपल्या. गेली दहा वर्ष मी नाटक-सिनेमा सिरीयलनिमित्तानं हळूहळू मुंबैत बिझी होत गेलो. पन शुटिंग-नाटकाचं प्रयोग करून परत सातारला येताना लिंबखिंडीतनं सातार्‍याकडं बघितल्यावर जे वाटतं मला, ते शब्दांत नाय सांगू शकत’.

‘…माझ्या घराशेजारी भक्कम पाय रोवून माझ्या पाठीशी उभा असलेला अजिंक्यतारा.. म्हैन्यातनं एकदातरी हाक मारून बोलवून घेनारं कास पठार.. आस्तीक असो नायतर नास्तिक, अस्सल सातारकर एकातरी श्रावनी सोमवारी यवतेश्वरला आनि दिवाळीत पयल्या अंघोळीला खिंडीतल्या गनपतीला जातोच.. कधीमधी सज्जनगडावर जाऊन तिथल्या महाप्रसादाची चव चाखतोच ! पावसाळ्यातल्या ठोसेघरपुढं स्कॉटलंड आन युरोप झक मारंल राजेहो !! कधी मन उदास झालं तर माहूलीला कृष्ना-वेन्नेच्या संगमावर जाऊन वहात्या पान्याकडं एकटक बघत बसायचं. मूड फ्रेश असला तर कन्हेर डॅमवर चक्कर मारायची… काय-काय सांगू! कधी वरच्या रोडवरनं राजवाड्यावर जाऊन खालच्या रोडवर्न परत पोवई नाक्यावर आलं तर आख्खं सातारा भेटतं… दोस्तलोकं हाक मारत्यात “ऐ किरन्या भावा…लै मोट्टा ॲक्टर झालास.. आमाला इसारला न्हायस ना? ये की घरी रैवारी मटन खायाला.” बास. आजून काय पायजे? मुंबै बापासारखी असली तरी सातारा आईसारखी माया करतं माझ्यावर… आपल्या आईला सोडुन कधी कुनी जातं का? म्हनूनच, मुंबैत काम करायला शंभर हत्तींचं बळ देनारा माझा सातारा आपन कधीच सोडनार नाय गड्या’.