हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच १५ ऑगस्ट २०२३ पासून कलर्स मराठी वाहिनीवर दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारलेली मालिका ‘सिंधुताई माझी माई- गोष्ट एका चिंधीची’ सुरु झाली आहे. या मालिकेत अनाथांची माय झालेल्या सिंधुताईंची संघर्षगाथा पहायला मिळते आहे. मालिकेत चिंधीचे वडील अभिमान साठे म्हणजेच सिंधुताईंच्या आयुष्यातील बापमाणसाची भूमिका अभिनेते किरण माने साकारत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने दीड वर्षानंतर किरण माने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर मालिकेत दिसणार आहेत. यानिमित्त त्यांनी एक पोस्ट शेअर केली होती. जी प्रचंड व्हायरल होत आहे.
यामध्ये किरण माने यांनी लिहिलंय, ‘आज ‘स्वातंत्र्य दिना’च्या दिवशी मी परत येतोय, ताठ मानेनं, ताठ कण्यानं ! दिड वर्षापूर्वीच्या ‘त्या’ दिवशी, ती घटना घडल्यावर मी सोशल मिडीयावर येऊन बोललो होतो : “काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा !” …आज ते सिद्ध करून दाखवलं ! पण मला आनंद होतोय तुमच्यासाठी. ‘त्या’ सगळ्या काळात तुम्ही मायबाप प्रेक्षक माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलात. मला पूर्वीपेक्षा शंभरपटींनी प्रेम दिलंत. त्यामुळं आज या क्षणी नम्रपणे तुम्हा चाहत्यांच्या पायाशी रहाणं, हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त आनंदाचं असेल’.
‘मी जी कलाकृती तुमच्यासाठी घेऊन येतोय, ती साधीसुधी नाय माझ्या भावांनो. शेकडो संकटांचा पहाड पार करून, हजारो अनाथांची माय झालेल्या सिंधुताईंवरची मालिका आहे ही ! माईंच्या काळजात ज्या व्यक्तीबद्दल ‘स्पेशल’ जागा होती.. ज्यानं माईंच्या व्यक्तीमत्त्वाचा पाया घातला, तो तुम्हाला माहित नसलेला ‘अनसंग हिरो’ मी साकारणार आहे. पैज लावून सांगतो, तो आणि त्याच्या लेकीमधला गहिरा जिव्हाळा पाहून तुम्ही हरवून जाल. हरखून जाल. यांना रोज भेटायची ओढ लागेल तुम्हाला !’
‘…त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळुन फक्त एक वर्षच झालंवतं जेव्हा विदर्भातल्या एका छोट्या खेड्यातल्या, त्या माणसाच्या घरी हे अफलातून लेकरू जन्माला आलं. आपली भुमी स्वतंत्र झालीवती, पण आपल्या जुनाट समाजव्यवस्थेतनं ‘स्त्री’ मुक्त नव्हती झाली. ती चारभिंतीच्या आत गुलामगिरीचे चटके सोसतच होती. अशा काळात सख्ख्या आईसकट सगळ्यांनी नाकारलेल्या लेकीला पोटाशी धरणारा… जीव लावणारा… तिला जोपासणारा… घडवणारा… ‘बापमाणूस’, द ग्रेट अभिमान साठे पुन्हा जिवंत करायला मिळणं, हे ‘अभिनेता’ म्हणून सुख आहे हो… निव्वळ सुख ! ‘कमबॅक’ अजून कसा पायजे सांगा बरं…?’ किरण मानेंची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचे चाहते या पोस्टवर कमेंट करत आपला आनंद व्यक्त करत आहेत आणि सोबतच किरण माने यांना नवी भूमिका तसेच नव्या मालिकेसाठी शुभेच्छा देत आहेत.