हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात लोकप्रिय अभिनेते किरण माने यांनी अलीकडेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे किरण माने प्रचंड चर्चेत आहेत. याशिवाय ते सोशल मीडियावर कायम अभिनय क्षेत्र, राजकीय क्षेत्र व सामाजिक विषयांवर अत्यंत परखडपणे आपले मत आपल्या प्रतिक्रिया देताना दिसतात. आताही त्यांनी अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी गनिमी काव्याचा उल्लेख करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी हि पोस्ट अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुकवर शेअर केली आहे.
किरण माने यांनी आपल्या नव्या पोस्टमध्ये छत्रपती शिवराय आणि त्यांच्या गनिमी काव्याचा उल्लेख केला आहे. हि पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिलंय कि, ‘छत्रपती शिवरायांनी गनिमी कावा केला पण तो शत्रूविरूद्ध केला. त्यावेळचा समाज अज्ञानी, अशिक्षित असूनही शिवरायांनी त्यांचा गैरफायदा घेतला नाही. हल्ली आपल्याच माणसांच्या विरोधात गनिमी कावा करणाऱ्यांची सद्दी आहे. विशेष म्हणजे शिकले- सवरलेले लोक अशा भामट्यांची ”अंधभक्ती” करतात’. किरण मानेंनी हि पोस्ट नेमकी कुणावर रोख ठेवून केली आहे ते यात स्पष्ट केलेलं नाही. मात्र या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
किरण मानेंच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट करताना लिहिलंय कि, ‘बरोबर याच महत्वाचं कारण जर कोणतं असेल.. तर शिवरायांनी ती माणसं माझी आहेत असं समजून केलं होतं तर आताचे हे सर्व गद्दार ही सगळी लोक माझ्यामुळे आहेत असं समजतात हाच फरक शिवरायांच्या विचारात आणि ह्यांच्यामध्ये आहे…’. तसेच आणखी एकाने लिहिलंय, ‘शत्रूसोबत करतात तो गनिमीकावा, आपलेच जेव्हा आपल्याच माणसांसोबत विश्वासघात करतात तेव्हा ती गद्दारी होते…!’