पैसा, दहशत, सत्ता अन् औरंगजेबाचा उल्लेख करत किरण मानेंनी साधला निशाणा; पोस्ट चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच शिवसेना कुणाची..? या प्रकरणाचा निकाल सुनावण्यात आला. दरम्यान शिवसेनेतील आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचं वाचन हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केले. यावेळी त्यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असे जाहीर केले आणि १६ आमदारांपैकी एकावरही अपात्रतेची कारवाई केली नाही. तसेच ठाकरे गटाच्या आमदारांवरही कारवाई झाली नाही. पण यानंतर विविध माध्यमातून येणाऱ्या प्रतिक्रिया फारच लक्षवेधी आहेत. अलीकडेच ठाकरे गटात समावेश केलेल्या अभिनेते किरण माने यांनीही पोस्ट लिहून आपलॆ प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे.

अभिनेते किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, ‘औरंगजेबाने या मुलुखावर ५१ वर्ष राज्य केलं होतं. तरीही आज हा मुलुख छत्रपती शिवाजी महाराजांनाच वंदनीय मानतो. पैसा आणि दहशतीच्या बळावर राजकीय सत्ता ”हिसकावणं” सोपं असतं… पण रयतेची मनं जिंकणं सोपं नसतं भावांनो. मुठभर मावळे हातात असून बलाढ्य शक्तीशी टक्कर देणारा जिगरबाजच जनतेच्या मनावर वर्षानुवर्ष राज्य करतो!!’ किरण मानेंची हि पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून अनेक शिवसैनिकांनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

खरी शिवसेना कोणाची..? तर एकनाथ शिंदेंची आणि पक्षासोबत चिन्हही त्यांचंच आहे, असं म्हणत राहुल नार्वेकरांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला मोठा झटका दिला. यामुळे आता ठाकरे विरुद्ध शिंदे या कायदेशीर लढाईत एकनाथ शिंदे वरचढ ठरले असे म्हणता येईल खरं पण विविध माध्यमातून समोर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता खरी शिवसेना कुणाची..? याबाबत जाहीर केलेल्या निकालावर अद्यापो प्रश्नचिन्ह आहे. अनेकांनी ठाकरे गटाच्या बाजूने प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.