आरक्षणातच माझा राम..!! ‘मुंबई हीच अयोध्या’ म्हणत मराठी अभिनेत्याची खरमरीत पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकीकडे अयोध्येत राममंदिर लोकार्पण सोहळ्याचा आनंद तर दुसरीकडे हक्काच्या आरक्षणासाठी लढाई सुरु आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा सुरूच आहे. दरम्यान, या लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील मोठ्या संख्याबळासह मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला अभिनेते किरण माने यांनी जाहीर पाठिंबा दिला असून याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राम मंदिर सोहळा आणि मराठा आरक्षण अशा दोन्ही मुद्द्यांवर अत्यंत परखडपणे भाष्य केलं आहे.

अभिनेता किरण माने यांनी अधिकृत सोशल मीडिया हँडलवर मराठा आरक्षणाचे फोटो शेअर करत लिहीलं आहे कि, ‘आम्ही हक्काचं आरक्षण मागतोय. बाकी कुठल्याही जातीवर अन्याय न करता ते द्या. अशी मागणी करत लाखोंच्या संख्येनं मराठा समाज बाहेर पडलाय. आपल्या अधिकारासाठी संवैधानिक मार्गानं आंदोलन सुरूय. या गर्दीत माझे स्वत:चे कितीतरी नातेवाईक आहेत. आपल्या पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षिततेच्या चिंतेनं त्यांना हे पाऊल उचलायला मजबूर केलंय. वयाची सत्तरी पार केलेले माझे एक नातेवाईकसुद्धा आंदोलनात हट्टाने सामील झालेत’.

‘मी फोन केला, “तुमची तब्येत आम्हाला महत्त्वाची आहे. परत या. लोकांनी घरात बसुन टीव्हीवर राम मंदिराचा सोहळा बघावा म्हणून सुट्टी दिलीय सगळ्यांना. नातवंडं, पाहुणे आलेत. एकत्र मिळून बघा”. ते म्हणाले, “नाही. ते बघून काय मिळनारंय? महागाई कमी हुनारंय का आपल्या पोरांना रोजगार मिळनारंय? आता आरक्षणातच माझा राम आहे. मुंबई हीच अयोध्या. नातवंडांसाठीच मी हे करतोय. आम्ही दुसर्‍याच्या ताटातला घास हिसकावून घेत नाही. आमचा हक्काचा आमच्या नातवंडांच्या मुखात पडायला हवा”.

पुढे लिहिलंय, ‘…मोर्चा जिथे जिथे जातोय तिथे दलित, मुस्लिम, धनगर, माळी असा सगळा समाज पाण्यापासून खाण्याची सगळी सोय बघतोय. ग्राऊंड लेव्हलवरचा बहुजन फुटलेला नाही, हे आशादायी चित्र आहे. राजकीय चित्र काहीही दाखवूदेत. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रचंड इच्छा होती. ते म्हणालेही होते की ”एक दिवस मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासेल, पण त्यावेळी ते द्यायला मी नसेन!” महामानवाच्या दूरदृष्टीला सलाम. जय शिवराय जय भीम..’. किरण मानेंची हि पोस्ट व्हायरल झाली आहे.