‘तो क्षण मी आयुष्यभर..’; किरण मानेंनी शेअर केली सरत्या वर्षातील खास आठवण


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। २०२३ हे वर्ष संपायला मोजून १ दिवस आणि काही तास बाकी आहे. सरत्या वर्षातील अनेक आठवणींची उजळणी करत जो तो या वर्षाचा निरोप घेण्यास सज्ज झाला आहे. अशीच एक खास आणि अभिमानास्पद आठवण अभिनेता किरण माने यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

किरण माने यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट हि व्हिडीओ पोस्ट आहे. या व्हिडिओत २०२३ सालातील ‘सम्यक पुरस्कार’ सोहळ्यातील खास क्षण पहायला मिळत आहे. जिथे किरण माने यांना कष्टकऱ्यांचे कैवारी आणि सत्यशोधक बाबा आढाव यांच्या हस्ते ‘सम्यक पुरस्कार’ प्रदान केला जात आहे. किरण माने हा पुरस्कार स्वीकारताना प्रचंड आनंदी दिसत आहेत. हा पुरस्कार स्वीकारतानाचा क्षण त्यांच्यासाठी या वर्षातील अत्यंत अभिमानाचा क्षण आहे असे म्हणत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

किरण माने यांनी या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘सम्यक पुरस्कार. सरत्या वर्षाची सगळ्यात अभिमानास्पद आठवण. माझे आजोबा मिलमध्ये हमाल होते. अशा हमाल, मजुरांच्या हक्कांसाठी ज्यांनी आयुष्य खर्च केले असे कष्टकर्‍यांचे कैवारी, सत्यशोधक डाॅ. बाबा आढाव यांनी माझ्या डोक्यावर मानाची ‘फुले पगडी’ घातली, शाल खांद्यावर टाकली…तेव्हा माझ्या आजोबांच्या कणखर, मजबूत, कष्टानं घट्टं पडलेल्या हाताचा स्पर्श जाणवला मला… तो क्षण मी आयुष्यभर काळजात जपून ठेवेन !’