‘जीवघेणा अनुभव देणारं नाटक…’; ‘पुनःश्च हनिमून’ नाटकासाठी मराठी अभिनेत्याची पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी रंगभूमीवर सुरु असलेलं ‘पुनःश्च हनिमून’ हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. नाटकाचे कथानक, रूपरेषा, कलाकारांनी वठवलेली पात्र, त्यांचा अभिनय, संवादफेक, नेपथ्य, प्रकाशयोजना प्रत्येक बाबतीत नाटकाची टीम उजवी आहे. त्यामुळे हे नाटक रंगभूमीवर चांगलंच गाजतंय. नुकताच या नाटकाचा दादर, शिवाजी मंदिर येथे प्रयोग पार पडला. या प्रयोगाला अभिनेते किरण माने उपस्थित होते. नाटक पाहिल्यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या नाटकावर, कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव करताना एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी नाटकाच्या टिमसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंसोबत किरण मानेंनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘ “रोना चाहता हूँ, पर रोने नहीं देता, मेरा अतीत मुझे सोने नहीं देता!” एखाद्याच्या भूतकाळात एखादी अशी भयंकर कटू घटना घडून गेलेली असते की जिचं सावट तो आयुष्यभरासाठी आपल्या मनामेंदूभोवती लपेटून घेतो… आपल्यासोबत आपल्या जवळच्यांचं जगणंही गढूळ करून टाकतो. हे असं भिती आणि दु:खाच्या छायेत जगणं किती टोकाला जाऊ शकतं याचा जीवघेणा अनुभव देणारं नाटक परवा पाहिलं, ”पुनश्च हनिमून”! सुहास आणि सुकन्या हे मुंबईत रहाणारं जोडपं. लग्नाला दहा वर्ष झालीत. दोघांमध्ये कित्येक काळ शारीरिक दुरावा आहे. त्यामुळे मानसिकदृष्ट्याही दोघे एकमेकांपासून तुटायला लागलेत. सुहासनं पुर्वी एक कादंबरी लिहीलीय, त्याला पुरस्कार मिळालाय. पण त्यानंतर मात्र त्यानं अनेक कथा, कादंबर्‍या अर्धवट लिहून सोडून दिल्यात. त्याच्या लेखनात आणि बायकोसोबतच्या नात्यातही जो ब्लाॅक आलाय, त्याचं कारण आहे, त्याच्या भूतकाळातील काही त्रासदायक घटना!’

‘आपल्या रिलेशनची घडी पुन्हा व्यवस्थित बसावी… सगळं सुरळीत सुरू व्हावं… शारिरीक संबंधाबरोबर मनंही नव्यानं जुळुन यावीत… या सगळ्यासाठी सुकन्या एक निर्णय घेते. दहा वर्षांपूर्वी लग्नानंतर त्यांनी जिथं हनिमून केला होता. त्याच हॉटेलात, त्याच रूममध्ये जाऊन काहीकाळ रहायचं. ते दिवस पुन्हा अनुभवायचे. हे दोघे माथेरानला पोहोचतात आणि सुरू होते एक रोलर कोस्टर राईड! अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी दोघांनीही अक्षरश: खिळवून ठेवणारा अभिनय केलाय. दोघांनाही मी काॅलेजच्या एकांकिकांच्या दिवसांपासून पहातोय. त्यांची प्रगल्भता, भावनिक उत्कटता, आवाजाचा वापर, देहबोली याचा पुरेपूर वापर त्यांनी या नाटकात केलाय. अमित फाळकेने वेगवेगळ्या भुमिकांमध्ये आवाज आणि देहबोलीचा कुशलतेनं वापर करत छान साथ दिलीय. मीरा वेलणकरनं अतिशय बोलकं, प्रतिकात्मक आणि समर्पक नेपथ्य केलंय. लै दिवसांनी शिवाजी मंदिरला लै लै लै भारी नाटक बघण्याचा आनंद घेतला. अमृताबरोबर मी केलेल्या ”परफेक्ट मिसमॅच” नाटकाच्या आठवणी जाग्या झाल्या. दिल खुश हो गया. लब्यू अमृता… लब्यू संदेश’.