‘बच्चननं स्वत:मधला बच्चन हरवला पण…’; सातारच्या बच्चनची बिग बींसाठी पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज बॉलिवूड सिनेविश्वाचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ८१’वा वाढदिवस आहे. यानिमित्त सोशल मीडियावर बिग बींचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अगदी बॉलिवूड पासून टॉलिवूड आणि मराठी सिनेविश्वातील कलाकार मंडळी आवर्जून अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. यामध्ये टीव्ही अभिनेत्री किरण माने यांचाही समावेश आहे. त्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुकवर एक पोस्ट शेअर केला आहे.

अभिनेते किरण माने यांनी बिग बींसाठी एक खास लांबलचक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये किरण माने यांनी लिहिले आहे कि, ‘…. या पोस्टबरोबर टाकलेलं हे मीम खरंतर बिगबॉसमध्ये ‘सातारचा बच्चन’ हा टॅग मिळाल्याची खिल्ली होती… पन तरीबी ‘मराठी मीम मॉक्स’वरचं हे मीम बघून मी लै हसलो होतो. लैच भारी वाटलंवतं. शाळेत असल्यापास्नं ह्या टोमन्याची सवय हाय मला.…”किरन्या माने सोत्ताला बच्चन समजतो.” लहानपनापास्नं ऐकत आलोय. खरंतर म्हन्नार्‍यानं ते चिडून म्हन्लेलं असायचं, पन मनातल्या मनात मी लै खुश हुयाचो! लहानपनी ‘बच्चन’ हे माझं ‘जग’ होतं… मायनीच्या ‘गरवारे टुरींग टॉकीज’च्या तंबूत बच्चनच्या पिच्चरचं रीळ आल्यापास्नं मी तिथं हजर असायचो. आलेली पोस्टर्स उलगडून बघSSSत रहानं हा आवडता छंद होता… रीळ चेक करताना टाकलेले फिल्मचे तुकडे मी घेऊन यायचो…’

‘मग ती फिल्म बल्बपुढं धरून एकेका फ्रेममधला बच्चन न्याहाळत बसायचा नाद होता.. पिच्चर जाईपर्यन्त रोज बघायचो मी. पाठ व्हायचा पिच्चर.. मग खंडोबाच्या माळावर दोस्त जमवून त्यांना बच्चनची ॲक्टिंग करून दाखवत अख्ख्या पिच्चरची स्टोरी सांगायची…बच्चनचं चालनं – बोलनं – बघनं – उभं रहानं – बसनं – पळनं – फायटिंग करनं सगळं- सगळं माझ्यात भिनलंवतं ल्हानपनी. …त्याचवेळी कधीतरी अन्यायाविरूद्ध लढनारा-जुल्मी व्यवस्थेविरूद्ध बंड पुकारनारा-गोरगरीबांसाठी पैशेवाल्यांशी पंगा घेनारा ‘अँग्री यंग मॅन’ मनामेंदूत, रक्तात भिनला! आता तरूनपनी मी कॉलेजमध्ये- हौशी नाट्यक्षेत्रात कुणावर अन्याय झाला की पुढाकार घेऊन नाटकातल्या प्रस्थापितांशी पंगे घ्यायला सुरूवात केल्यावरही आजूबाजूचे म्हनायला लागले, “हा काय स्वत:ला बच्चन समजतो का काय?”… ते ऐकूनबी मला लै भारी वाटायचं!’

‘…पण खरे धक्के बसायला सुरूवात झाली ती अलीकडच्या दहाबारा वर्षांत! तोच ‘अँग्री यंग मॅन’ वैयक्तिक आयुष्यात व्यवस्थेला शरण जाणारा, मान खाली घालून स्वाभिमान गुंडाळून ठेवनारा हा ‘शहेनशाह’ बघून वाईट वाटायला लागलं… पूर्वी पेट्रोल ६० रूपये झाल्यानंतर सोशल मीडियावरुन जहरी टीका करणारा बच्चन आज पेट्रोल गगनाला भिडूनबी ‘चुप्पी साधलेला’ बघून आश्चर्य वाटायला लागलं… कुणाच्यातरी आदेशावरनं आरेच्या वृक्षतोडीचं समर्थन करण्याची पोस्ट करनारा… ज्या पंजाबनं त्याला मुलगा मानलं, त्या पंजाबी शेतकर्‍यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा मूग गिळून गप्प बसनारा… केविलवाना बच्चन बघून कीव यायला लागली. …पन लै इचार केल्यावर एक लक्षात आलं की, या माणसानं त्याच्या अभिनयाच्या ताकदीवर जो ‘बच्चन’ आपल्या मनामेंदूत-रक्तात धगधगता ठेवलाय तीच त्यानं आपल्याला दिलेली ताकद ! बच्चननं स्वत:मधला ‘बच्चन’ हरवला पण आपल्यामध्ये तो आहेच की…जिवंत – रसरशीत – खणखणीत !! त्यानं त्याचं आयुष्य कसं जगायचं ते आपन नाय ठरवू शकत. आपल्याला जे हवंय ते त्यानं दिलंय, भरभरुन.. बस्स !!! सलाम महानायक, कडकडीत सलाम…’.