तुम्ही अण्णाजींचा रोल करताय..? सिंधुताईंच्या लेकीचा ‘तो’ मॅसेज पाहून भारावला अभिनेता


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। येत्या १५ ऑगस्ट २०२३ पासून कलर्स मराठी वाहिनीवर अनाथांना मायेच्या पदराची उब देणाऱ्या समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित मालिका सुरु होते आहे. या मालिकेचे नाव ‘सिंधुताई माझी माई- गोष्ट एका चिंधीची’ असे आहे.

या मालिकेत अभिनेता किरण माने हे सिधुताईंचे बाबा अभिमान साठे यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यांना या भूमिकेत पाहण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड आतुर झाले आहेत. तर सिंधुताई यांच्या कन्या ममता यांनीदेखील याबाबत आनंद व्यक्त केला आहे. एका मेसेजमधून त्यांनी सिंधुताई आणि त्यांच्या बाबांचं नातं कसं होतं ते सांगत किरण माने यांचं भूमिकेसाठी अभिनंदन केलं.

याविषयी एक पोस्ट शेअर करताना किरण माने यांनी ममता ताईंसोबतचा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं कि, ‘”आई गं… किरणदादा तुम्ही अण्णाजींचा रोल करताय? हे पहायला आई हवी होती. तिचा खूप जीव होता त्यांच्यावर आणि त्यांचाही तिच्यावर. अभिमान होता तिला अण्णाजींचा”. सिंधुताईंच्या कन्या ममता ताईंचा मेसेज वाचून भारावून गेलो होतो. कधी एकदा त्यांना भेटायला जातोय असं झालंवतं. कलर्स मराठी वाहिनीनं, ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेच्या निमित्तानं आयोजित केलेल्या ‘विद्यादान’ या मौल्यवान उपक्रमात ही भेट झाली. थेट सिंधुताईंनी स्थापलेल्या अनाथाश्रमात. ”सन्मती बाल निकेतन”मध्ये पाऊल ठेवलं आणि भारावून गेलो!’

‘तिथली मुलं मुली खूप प्रेमानं, आस्थेनं आदरातिथ्य करत होती. आमच्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले त्यांनी. सिंधुताईंनी सगळ्यात पहिल्यांदा ज्या अनाथ पुत्रावर सावली धरली ते दिपकदादा गायकवाडही भेटले… महाराष्ट्रातल्या काही निवडक शहरांतून जमा केलेली पाच हजार पुस्तकं ‘सन्मती’च्या मुलामुलींच्या हाती सोपवताना मन भरून आलं. खरंच अभिनेता म्हणून अपार समाधान देणारे हे क्षण असतात… काळजाच्या कप्प्यात जपून ठेवावे असे…’. दरम्यान मालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ५ शहरांत ‘करून विद्यादान करूया सिंधुताईंचा सन्मान’ हा विद्यादानाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाची सांगता सिंधुताईंच्या आश्रमात करण्यात आली आणि यावेळी मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती.