हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात किरण माने हे नाव नेहमीच चर्चेत असतं. मालिका विश्वातून बिग बॉस सारखा रिऍलिटी शो गाजवल्यानंतर किरण माने यांचं क्रेझ तुफान वाढलंय. किरण माने सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि त्यामुळे ते विविध पोस्टच्या माध्यमातून व्यक्त होतात हे काही वेगळं सांगायला नको. त्यांची प्रत्येक पोस्ट बोलकी असते. याहीवेळी अशीच एक बोलणारी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी बिग बॉसला गॉड फादर म्हणून संबोधलं आहे.
किरण माने यांनी बिग बॉस शोमधील जर्नीचा एक व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘३ जुलैला, बरोब्बर एक वर्षांपूर्वी सकाळी फोन वाजला. हॅलो किरण सर, मी एन्डेमाॅलशाईन मधून बोलतेय. बिग बाॅस सिझन चार साठी आम्ही तुमचा विचार करतोय. होकार असेल तर आम्ही उद्या मिटींगसाठी तुम्हाला भेटायला येऊ का..? एक निर्णय. हो म्हणू की नाही..? वादळ उठलं मनामेंदूत. बिग बाॅसचं घर लै रिस्की. लै अफवा. कोण म्हणायचं, ती शापीत ट्राॅफी घेणार्या प्रत्येकाचं अभिनेता म्हणून करीयर संपलेलं आहे. कोण सल्ला द्यायचं, तिथं ठरवून एखाद्याला बदनाम करतात. कोण भिती घालायचं, आधीच काही लोक टपून बसलेत तुझ्या वाईटावर. त्या माकडांच्या हातात कोलीत देऊ नकोस. लै विचार करून म्हन्लं, च्यायला हे चॅलेंज तर घेतलंच पायजे. हे सगळं खोटं ठरवायचा दम हाय आपल्यात. माझ्या चाहत्यांची ताकद जास्त हाय का हितशत्रूंची ते बी जगाला दाखवूया. उतरूया मैदानात. जे हुईल ते हुईल’.
‘…भावांनो आणि बहिणींनो, या निर्णयानं माझं अख्खं आयुष्य बदलून गेलं. आधी सर्वांना वाटलं हा लेचापेचाय. दोन आठवड्यात उडवू. पण भलेभले, स्वत:ला धुरंधर समजणारे ‘गामा’, पालापाचोळ्यासारखे उडवून लावत मी ‘टाॅप थ्री’पर्यन्त पोहोचलो. त्या अद्भूत घरातनं बाहेर येताच पब्लीकनं जल्लोषात मला डोक्यावर घेतलं. सातार्यात मिरवणूकीनं जंगी स्वागत झालं. महाराष्ट्रभर सत्कार झाले. अनेक पुरस्कार मिळाले. आजवर बिगबाॅस फक्त शहरी विभागात पाहिलं जायचं. माझ्यासाठी आमचा अख्खा ग्रामीण भाग बिगबाॅस पाहू लागला. माझ्या मातीत ‘आपला माणूस’ अशी ओळख झाली. थेट महेश मांजरेकरानी सिनेमात घेतलं. ‘गोलमाल’, ‘सिंघम’ फेम बाॅलीवूडमधले प्रसिद्ध आर्ट डिरेक्टर नरेंद्र राहुरीकर यांच्या पहिल्या मराठी सिनेमात महत्त्वाची भुमिका केली’.
‘एका मोठ्या-भव्यदिव्य आगामी सिरीयलचं शुटिंग सुरू झालं. हे संपलं की एक जबरदस्त नाटक वाट पहातंय. तिन्ही माध्यमांत बिझी झालो. माझ्या बाबतीतल्या आणि बिगबाॅसच्या बाबतीतल्याही सगळ्या अफवा खोट्या ठरल्या. आजवर मला कुणी गाॅडफादर नव्हता. माझ्या डोक्यावर कुणा बड्या दिग्दर्शकाचा, निर्मात्याचा, चॅनलचा हात नव्हता. एकट्याच्या बळावर लढत इथवर आलोय. पण आता म्हणेन, माझा गाॅडफादर कुणी असला तर एकच – ‘बिगबाॅस’ ! लोकप्रियतेच्या आणि अभिनयक्षेत्राच्या खूप वरच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी जर कुणी मदत केली असेल तर ती फक्त या शो नं… लब्यू बिगबाॅस… – किरण माने’.