हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण राज्यभरात जातीय सर्वेक्षण करण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करत आहेत. याबाबत मराठी अभिनेत्री केतकी चितळे आणि अभिनेता पुष्कर जोग यांनी संताप व्यक्त केला होता. जात विचारण्याबद्दल दोघांनीही आक्षेप घेत सोशल मीडिया हँडलवर प्रतिक्रिया दिल्या होत्या. दरम्यान पुष्कर जोगने ‘सर्वेक्षण करणारी महिला नसती तर दोन लाथा मारल्या असत्या’ असं विधान केलं आणि वाद ओढवून घेतला. मात्र अनेकांनी कानउघाडणी केल्यानंतर त्याने दिलगिरी व्यक्त केली. दरम्यान किरण माने यांनी पोस्ट करत दोघांवर टीका केली होती आणि त्यानंतर एका मुलाखतीतही प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेता किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पुष्कर जोगचा समाचार घेतला होता. तर जातीय सर्वेक्षणसंदर्भात एका नामवंत वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केतकी चितळेच्या विधानांवर प्रतिक्रिया दिली आहे. तिच्याबद्दल बोलताना किरण माने म्हणाले, ‘मला जात का विचारता? याबद्दल जर तिने सरकारला सवाल केला असता तर ते मत व्यक्त करणं झालं असतं. त्या कर्मचाऱ्याला त्याची जात विचारायची, त्यातून अॅट्रोसिटीचा टोमणा मारायचा, हा जातीयवाद नाही का? त्यानंतर माझी ही जात अजिबात नाही, असं म्हणत स्वतःची जात सांगताना एक पोकळ अभिमान दाखवायचा’.
‘ज्या जातीचा अभिमान वाटायचं कुठलंही कारण नाही. तसा इतिहासही नाही. मग त्यावर ऑब्जेक्शन घेतो ना आपण. मत मांडणं वेगळं आणि दुसऱ्या जातीला कमी लेखणं वेगळं. यातील सुप्त स्वर ऐका तुम्ही त्यांचे. स्वतःची जात सांगताना किंवा जोग कानाखाली मारतील हे म्हणताना त्यात सुप्त राग आहे तो तुम्ही समजून घ्या. आमची आडनावं बघून तुम्हाला आमची जात कळत नाही? आणि तुम्ही आम्हाला काय जात विचारायला येता? हा एक वर्चस्ववाद असतो. त्यात आणखी एक हाही राग आहे की या संविधानाने आपलं वर्चस्व मोडीत काढलं गेलंय. तो एक राग आहे, तो राग सगळा यातून दिसतो’.