मापात रहा!! किरण मानेंनी केली पुष्कर जोगची कानउघाडणी; खुलं आव्हान देत म्हणाले, ‘आहे दम तुझ्या पार्श्वभागात..?’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जातीय सर्वेक्षण सुरु आहे. ज्याबाबत अभिनेत्री केतकी चितळे आणि त्यानंतर अभिनेता पुष्कर जोग यांनी संताप दर्शवला. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जात विचारली असता त्यांना राग आला. जो त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला. दरम्यान, अभिनेता पुष्कर जोगने आपल्या पोस्टमध्ये ‘सर्वेक्षण कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या… कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील’, असे लिहिले. त्याच्या या वक्तव्यावर आता अभिनेता किरण माने यांनी संताप दर्शवत एक पोस्ट शेअर करत थेट अभिनेत्याला आव्हान दिलं आहे.

किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘आमच्या मनोरंजन क्षेत्रातल्या वर्चस्ववाद्यांना हल्ली उन्माद चढलाय. ”आमचीच सत्ता” हा पोकळ माज आलाय… मी परवाच ‘अजब गजब’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोललो. दुसर्‍याच दिवशी पुष्कर जोग नावाच्या, सिनेमात वगैरे काम करणार्‍यानं विधान केलं, ”जातगणना करायला आलेली बाई नसती तर मी दोन लाथा घातल्या असत्या”. अरे भावा, ते सरकारनं दिलेल्या आदेशामुळे तुझ्या घरी आलेले साधे कर्मचारी होते रे ते. त्यांना हौस नाही तुमचे उंबरठे झिजवायचे. तुला लाथाच घालायच्यात ना??? लै राग आलाय का तुला जात विचारल्याचा??? …मी तुला चॅलेंज देतो- ज्याने हा जातगणनेचा आदेश सोडलाय त्या नेत्याला लाथा घाल. चल’.

‘खुल्लं आव्हान आहे माझं. तू जर त्या जातगणनेचा आदेश देणार्‍या सत्ताधारी नेत्याला लाथा नाही घातल्यास तर तू त्या कर्मचार्‍याकडून चार लाथा खायच्या. बोल. आहे दम तुझ्या पार्श्वभागात??? अरे या नेत्यांचे पाय चाटणारी जमात तुमची. आडनांव घेऊन डिंग्या मारतोयस? काय घंटा इतिहास आहे तुमच्या आडनांवाचा? असला तरी काय खुट्ट्याला बांधायचाय?? आपलं काम इमानेइतबारे करणार्‍या कर्मचार्‍यांवर कसला माज दाखवतो तू??? हे कर्मचारी जर आपली नोकरी बाजूला ठेवुन तुझ्यासमोर आले ना, तर एका दणक्यात तुझं वाकडं शेपूट सरळ करतील. नाद करू नको गरीबांचा. बुद्धी जागेवर ठेवून बोलत जा. मराठ्यांच्या आणि ओबीसींच्या लढ्यात तू तुझ्या द्वेषाची पोळी भाजून घेऊ नकोस. बहुजन शांत आहेत म्हणून मस्तीत विधानं करणं लै महागात पडेल. मापात रहा’. या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत किरण मानेंच्या मताशी सहमती दर्शवली आहे.