‘देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो..’; जरांगे पाटलांच्या भूमिकेला किरण मानेंचा पाठिंबा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आरक्षण मागणीसाठी जालन्याच्या आंतरवाली येथे मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणास बसले आहेत. यावेळी आपण पाणी आणि औषध घेणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. आपल्या समर्थकांच्या विनंतीनंतर ते पाणी तर प्यायले. मात्र जो पर्यंत सरकार त्यांची मागणी मान्य करणार नाही तोवर उपोषण सोडणार नाही असे त्यांनी ठाम सांगितले आहे. यावर अनेक राजकारण्यांनी तसेच कलाकार मंडळींनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटील त्यांच्या ठाम भूमिकेला अनेकांनी पाठींबा दिला आहे. यामध्ये अभिनेता किरण माने यांचाही समावेश आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांचे समर्थन केले आहे. सोबतच अत्यंत रोखठोक पद्धतीने आपले मत प्रकट केले आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असून चांगलीच चर्चेत आली आहे.

किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘जरांगे पाटील… या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलंय. खरंतर असं पूर्वी घडणं सहजशक्य होतं, कारण व्यवस्थेला संविधानाचा धाक असण्याचा तो काळ होता. आजच्या भवतालात, संविधान गुंडाळू पहाणाऱ्या या व्यवस्थेला तो धाक दाखवण्याचं’ महान कार्य तुम्ही करताहात ! तब्येतीला सांभाळा. आम्हाला तुमची गरज आहे’. किरण माने यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया जरांगे यांचे समर्थन केले आहे.