‘TRPच्या आहारी जाऊन खोटे ड्रामे..’; मालिकांच्या कथानकाविषयी किरण माने स्पष्टचं बोलले


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा किरण माने हे बिग बॉस मराठी सीजन ४’मूळे प्रचंड चर्चेत आले. या शोनंतर त्यांची लोकप्रियता ग्रामीण भागात तसेच शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. यामुळे सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. त्यांचे चाहते त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी फार उत्सुक आहेत. तर किरण माने लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर सुरु होणाऱ्या ‘सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची’ या मालिकेत दिसणार आहेत. या मालिकेत किरण माने कोणती भुमिका साकारणार हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र या निमित्ताने किरण माने यांनी मालिकांविषयी एक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये किरण माने यांनी लिहिलंय कि, ‘प्रेक्षकहो, तुमचा माझ्यावर असलेला विश्वास मी कधीच तोडणार नाही. आता माझी ही जी कलाकृती येतेय… ती तुमचे मनोरंजन तर करेलच, पण तुमचं आयुष्य समृद्ध करणारं खूप मोलाचं काहीतरी देण्याची ताकदही यात असणार आहे, याची मी तुम्हाला खात्री देतो. ‘मालिका उथळ असतात’, ‘सासु-सून, नणंद- भावजया यांच्यातला कलह किंवा विवाहबाह्य संबंध यापलीकडे मालिकांना विषय नसतात’ अशा तक्रारी कायम केल्या जातात. त्यात तथ्यही आहे. पण आता या सगळ्या चौकटी मोडून- तोडून प्रेक्षकांना एक अस्सल, आशयघन, प्रभावी आणि काळजाला स्पर्श करणारं काहीतरी देण्याचा प्रयत्न ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतून केला आहे.

पुढे लिहिलंय, ‘या सिरीयलमध्ये टीआरपीच्या आहारी जाऊन खोटे ड्रामे भरले जाणार नाहीत. या सिरीयलमध्ये कथानकात पाणी घालून ते पसरट केले जाणार नाही. या सिरीयलच्या चित्रीकरणापासून दिग्दर्शनापर्यंत आणि लेखनापासून अभिनयापर्यंत सगळ्या गोष्टी, तुम्हाला एखादा दर्जेदार सिनेमा पाहत असल्यासारखा आनंद देतील! तुम्ही, विशेषत: ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य प्रेक्षकांनी मला लावलेला अतोनात जीव, हे माझं बळ आहे. एक अभिनेता म्हणून मला तुमचं प्रचंड प्रेम लाभलंय. चाहत्यांचं हे प्रेम सार्थ ठरावं यासाठी, या जगावेगळ्या मालिकेतली एक अफलातून भुमिका मी समरसून, तनमन अर्पून साकारण्याचा प्रयत्न करतोय…’सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची’ ही नवी मालिका १५ ऑगस्टपासून सं. ७ वा. आवर्जुन कलर्स मराठीवर पाहता येईल’. प्रेक्षकांमध्येही या मालिकेविषयी विशेष आकर्षण आणि उत्सुकता आहे.