हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वात किरण माने माहित नाहीत असे क्वचितच कुणी भेटेल. केवळ अभिनेता नव्हे तर उत्तम सदारकर्ता आणि वक्ता म्हणूनदेखील किरण माने यांची ओळख आहे. त्याच्या अभिनयाइतकीच लेखणीलादेखील धार आहे. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली प्रत्येक पोस्ट कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ते कलर्स मराठीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत सिंधुताईंचे वडील म्हणजेच अण्णा (अभिमान साठे) हि भूमिका साकारत होते. आता या भूमिकेचा मालिकेतील काळ संपला असल्यामुळे मानेंना निरोप घ्यावा लागत आहे. अत्यंत भावनिक पद्धतीने त्यांनी पोस्ट शेअर करत मालिकेला, मालिकेतील कलाकरांना निरोप दिला आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी मालिकेतील कलाकारांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. सोबत लिहिलंय, ‘ “बाप म्हणे, लेक माझी आंजूळ मंजूळ… आधी भरील वंजूळ, मग टाकील तांदूळ !” …लाडक्या लेकीला आणि जावयाला भेटून अभिमान साठेचं काळीज सुपाएवढं झालं. अभिनेता होणं आणि लेखकानं मनापास्नं लिहीलेली दर्जेदार भुमिका मिळणं यासारखं दूसरं समाधान नाही ! नटाला एका आयुष्यात अनेक आयुष्यं जगायला मिळतात. त्यातली काही आपलं आयुष्य समृद्ध करून जातात. सगळ्या दुनियेनं नाकारलेल्या चिंधीला अभिमाननं दुनियाभरची माया दिली… शिकवलं… जपलं… तुकोबारायाच्या विचारांचा वारसा दिला…दहा वर्षांच्या अंतरानं चिंधीचा संसार पहायला जाताना त्याचं मन भरून आलं. तिच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेला जावई आणि गोड नातवंडांमध्ये रमून गेला. सासरच्या इतर माणसांकडुन तिरस्कार अनुभवणार्या मुलीची वेदनाही नजरेतनंच त्यानं ओळखली…’
‘निरोप घेताना, तिने घट्ट पकडलेल्या हातातून हात सोडवताना… आसवांनी भरलेल्या अनिमिष नजरेवरुन नजर खेचून तोडुन, पाठ वळवून जाताना त्याची पावलं अडखळली… या भुमिकेनं आयुष्यभर पुरून उरेल एवढं दान दिलं. लहान चिंधीची भुमिका करणारी अनन्या जितकी गोड होती, तितकीच मोठी चिंधी शिवानी सोनार लोभस आहे ! तिच्याबरोबर भावनिक प्रसंग साकारताना दोघेही खूप भावुक झालो… जावई झालेला अतुल आगलावे माझ्यासमोर घडलेला अभिनेता. माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकाचा म्युझीक ऑपरेटर होता तो… तिथुन नायकाच्या भुमिकेपर्यन्त त्यानं केलेल्या संघर्षाचा मी साक्षीदार आहे. त्याच्या बरोबरचा एक सिन अफलातून होता. दोघांनीही ‘दिल से’ केला तो. अशी ‘दिलकश’ भुमिका आणि असे दिलदार सहकलाकार लाभणं हे लै लै लै आनंद देणारं आहे ! ‘सिंधुताई’ मालिकेनं अभिनेता असण्याचं खूप मोठं अवाॅर्ड दिलं मला… अभिमान साठेच्या रुपात ! लब्यू कलर्स मराठी’