हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या आठवड्याभरात मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठीचे उपोषण हा विषय सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत होता. दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आणि राज्य सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी २ महिन्यांची मुदत दिली. इतकेच नव्हे तर उपोषण मागे घेताना मराठा समाजाचे राज्यभरातील साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनाला अनेक कलाकार मंडळींचे समर्थन लाभले. ज्यामध्ये अभिनेते किरण माने यांचाही समावेश आहे. दरम्यान त्यांनी एक पोस्ट हेअर करत मराठा आंदोलकांना आवाहन केले आहे.
किरण माने यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुकवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘मराठा बांधवांनो…आपल्या महामानवांनी कधीही दुसर्या समाजाला कमी लेखलं नाही. तुकोबारायांनी विठ्ठलामध्ये बुद्धाला पाहिलं. छत्रपती शिवरायांनी सिद्दी इब्राहीमला अंगरक्षक पद दिलं. शाहूराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा विश्वरत्न घडवला! आरक्षणाला समर्थन देताना परजातीला कमी लेखणे किंवा भावनेच्या भरात कुणाची तुलना असामान्य महामानवांशी करून कटुता आणणे या गोष्टी त्वरित थांबवा. आपली लढाई स्वबळावर लढुया, कुणाला कमी लेखून नाही’. किरण मानेंची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
अभिनेते किरण माने हे कायम सोशल मीडियावर विविध विषयांवर मत प्रकट करताना दिसतात. जरांगेंच्या उपोषणावेळी त्यांनी वेळोवेळी पोस्ट केल्याचे आपण पाहिले. शिवाय मराठा आरक्षणासाठी आत्महत्या न करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. यानंतर आता उपोषण मागे घेतल्यावर आंदोलकांनी शांततेने आणि कोणत्याही समाजाचा अपमान न करता, अन्य समाजाला कमी न लेखता आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करावे, असे त्यांनी मत मांडले आहे. किरण माने यांच्या मताशी अनेकांनी सहमती दर्शवली आहे.