हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वातून प्रकाशझोतात आलेले किरण माने हे नेहमीच त्यांच्या विविध पोस्टमुळे चर्चेत असतात. ससोहळ मीडिया केवळ स्क्रोलिंगसाठी नव्हे तर व्यक्त होण्यासाठी ते वापरताना दिसतात. विविध विषयांवर ते अगदी स्पष्ट आणि थेट मांडणी करत अनेकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतात. संत तुकाराम यांच्या विचारांचा ते यातून प्रसार करत असतात. आताही त्यांनी एक अशीच पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी तुकाराम महाराजांना अभंग शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी तुकाराम महाराजांना बदनाम करण्यासाठी एका वेश्येला पैश्याच आमिष देऊ कसं पाठवलं… आणि त्या स्त्रीला तुकोबारायांनी कसं आदरानं दूर केलं… याच वर्णन केलं आहे.
किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘सेक्सची भूक… ही गोष्ट लै खत्तरनाक भावांनो! त्या नादात मानूस एकदा का घसरला की भल्याभल्यांचं माकड होतं..एकवेळ ‘बाटली’तनं मानूस सहज भायेर पडंल, पन बाईच्या मोहाच्या ‘पिंजर्यात’ अडकला की त्याच्या ‘नशिबानं थट्टा मांडली’च म्हनून समजा. हे लक्षात घेऊनच आपल्या तुकोबारायावर खार खाऊन असलेल्या विरोधकांनी त्याच्या बदनामीसाठी ‘हनी ट्रॅप’ लावलावता भावांनो.. पन चारीत्र्यवान तुकोबारायानं त्या बाईला आदरानं दूर करत असा उपदेश केला की तीसुद्धा या विचारांनी भारावून गेली.. अंतर्बाह्य बदलून गेली!
आपले तुकोबाराया त्या बाईला म्हन्ले :
पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचें चि ।।
जांई वो तूं माते न करीं सायास । आम्ही विष्णुदास नव्हों तैसे ।।
न साहावें मज तुझें हें पतन । नकों हें वचन दुष्ट वदों ।।
तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे जाले ।।
आम्ही स्वत:ला एक नियमच घालून ठेवलाय – परस्त्री रखुमाईसमान!..माझे माऊली, तू जा इथनं.. आम्हाला आकर्षित करायचे कसलेही प्रयत्न करू नकोस.. आम्ही विष्णुदास तसे नसतो….एका स्त्रीचं असं अध:पतन होणं, मला सहन होत नाही, तू ते वावगे शब्द तोंडातून काढूही नकोस. शेवटी तुका म्हणे, तुला जर नवराच पायजे – तुला संगच हवाय तर बाहेर नरांची कुठं कमी आहे?’
‘…मंबाजी आणि त्याच्या टोळक्यानं एका वेश्येला पैशांचं आमिष दाखवून तुकोबारायाकडं पाठवलंवतं. तिनं त्यांच्या प्रवचनाला जाऊन, अनुयायी असल्याचं नाटक करून तुकाराम महाराजांना नादी लावायचं आणि या टोळीनं त्यांना रेडहॅन्ड पकडून त्यांची बदनामी करायची असं कारस्थान रचलंवतं. पन तुकोबारायाला एवढे लेचेपेचे होते व्हय? आवो, तुकोबा वरवरचे संत नव्हते. आतून बाहेरून अस्सल, शंभर नंबरी सोनं होतं ते.. भुललं नाय असल्या मोहाला. या अभंगातनं तुकोबारायांनी समस्त वारकर्यांना एक मोलाचा संदेशबी दिलाय. “परस्त्री रखुमाईसमान आहे”. बाईकडं बघण्याची नजरच झटक्यात स्वच्छ होऊन जाते वो. शरीरसुखाचं आमिष दाखवणार्या बाईला “जाई वो तू माते” म्हणत दूर करायला लै लै लै टोकाचा संयम लागतो… तीसुद्धा एक बाई आहे, तिच्या शारिरीक इच्छा पूर्ण करून घ्यायचा तिला अधिकार आहे..त्या भावनेचा मान राखत, तिला सेक्सच हवा असेल तर बाहेर अनेक ‘नर’ आहेत, तिकडे तिनं जावं हे नम्रपणे सांगणं तर अफलातून आहे!’
‘आपल्याला शब्दांचा, भाषेचा समर्पकपणे वापर शिकायचा असंल तर तुकारामांच्या अभंगांसारखं साधन नाय! शेवटच्या ओळीत तुकोबारायांनी ‘पुरूष’ हा शब्द न वापरता ‘नर’ हा शब्द वापरलाय. इथं प्रतिभेची झलक दिसते. फक्त सेक्ससाठी एकत्र येतात ते ‘नर-मादी’. ‘पुरूष आणि स्त्री’मध्ये काहीतरी भावबंध निर्माण व्हावे लागतात! माझ्या दोस्तांनो, अफाट-अचाट-अफलातून माणूस होता आपला तुकोबाराया… खराखुरा संत. अस्सल समाजसुधारक. प्रतिभावान कवी! जोपर्यंत या पृथ्वीतलावर ‘माणूस’ आहे तोपर्यंत ही गाथा तरणार आहे..माणसाला हिताचा मार्ग दाखवत राहणार आहे’. किरण माने यांची हि पोस्ट सोशल मीडियावर इतर पोस्टप्रमाणेच व्हायरल होत आहे. शिवाय या पोस्टचा वाचक वर्गदेखील वाढताना दिसतोय.