हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक ३० जून २०२३ रोजी ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर सर्व माध्यमांवर या चित्रपटाची कमाल चर्चा रंगली आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस अक्षरशः दणाणून सोडलं आहे. या चित्रपटाचे कथानक, कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून गेला आहे. त्यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांकडूनचं नव्हे तर समीक्षकांकडूनसुद्धा कौतुकाची थाप मिळाली आहे. या चित्रपटाने तर बॉलिवूड सिनेमांना देखील मागे टाकले आहे आणि आठवड्याभरात तब्बल १२.५० कोटींचा गल्ला जमवला आहे.
केदार शिंदेंच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि अजूनही मिळतो आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर चांगली पकड मिळवली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता आठवडा झाला आहे आणि या पूर्ण आठवड्याभरात या चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलच्या माध्यमातून बॉक्स ऑफीस रिपोर्ट शेयर केला आहे. ज्यामध्ये केदार शिंदेंनी ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचा लेटेस्ट बॉक्स ऑफीस रिपोर्ट शेयर केला आहे. यानुसार केवळ आठवड्याभरातच या चित्रपटाने साडेबारा कोटींचा गल्ला जमवून बॉक्स ऑफिसवर कल्ला केला आहे.
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करताना दिसतोय. या चित्रपटाने बॉलिवूड अभियन्ता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या ‘सत्यप्रेम कि कथा’ला थंड पाडत विक्रमी गल्ला कमावला आहे. या यशाबद्दल बोलताना केदार शिंदे म्हणाले, ‘माझ्या आयुष्यात आलेल्या असंख्य स्त्रियांच्या आशिर्वादाने हे यश मिळालंय. मला जन्म देणारी आई… सांभाळणारी आजी.. लक्ष ठेवणाऱ्या मावश्या… मला लग्नानंतर सांभाळून घेणारी माझी बायको.. आनंद देणारी माझी मुलगी.. माझ्या प्रत्येक कामात सहभागी असणारी माझी सहकारी, अभिनेत्री आणि माझ्या कामावर प्रेम करणारी स्त्री प्रेक्षक.. हे तुमचं यश आहे. या सिनेमातली प्रत्येक स्त्री जी पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, तीचं हे यश आहे. मी फक्त निमित्त मात्र!! ही स्वामीआई ची कृपा हा सिध्दीविनायकाचा महाप्रसाद’.