‘तीन अडकून सीताराम’ पाहिल्यानंतर सुबोध भावे म्हणाला, ‘परिस्थितीनुसार घडणारे विनोद..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच २९ सप्टेंबर २०२३ रोजी, शुक्रवारी ‘तीन अडकून सीताराम’ हा नकोरे धमाल चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जो गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असून कला विश्वातून अभिनेता सुबोध भावेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या चित्रपटात तीन अतरंगी मित्रांची भलतीच दुनियादारी आपल्याला पहायला मिळत आहे.

हा चित्रपट पाहिल्यानंतर सुबोध भावेने प्रतिक्रिया देताना म्हटले कि, ‘मी आताच तीन अडकून सीताराम हा धमाल चित्रपट बघितला. यात प्राजक्ता, वैभव, आलोक आणि संकर्षण या सर्वांची एकत्र धमाल बघताना खूप मज्जा आली. मला असं वाटतं की आता आजूबाजूला पाऊस पडतो, रस्ते तुंबलेत, खड्डे पडलेत या सगळ्यात दोन- अडीच तास एक छान चित्रपट पाहून तुम्हाला हसता येतंय आणि यातून तुमचे निखळ करमणूक होते याचं महत्त्व जास्त आहे. तो या चित्रपटाने दिल्याबद्दल या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो. छोटे छोटे परिस्थितीनुसार घडणारे विनोद असतील ते तुम्हाला हसवतात आणि तीन मित्रांची एक धमाल तुमच्यासमोर सादर करतात. पुन्हा एकदा या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा. आवर्जुन हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघा’

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत ‘तीन अडकून सीताराम’ या मराठी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हे अभिनेता हृषिकेश जोशी यांनी केले आहे. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन प्रकाश वैद्य हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात वैभव तत्त्ववादी, प्राजक्ता माळी, आलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे, हृषिकेश जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने वैभव आणि प्राजक्ता ही जोडी पहिल्यांदाच एकत्र मोठ्या स्क्रीनवर पाहता येत आहे.