‘मी ब्राह्मण आहे, मला..’; जातीय सर्वेक्षणाबाबत अभिनेते शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभरात जातीय सर्वेक्षण सुरु आहे. याबाबत रविवारी अभिनेता पुष्कर जोगने संताप व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली होती. ‘जात विचारणारी ती महिला कर्मचारी नसती तर दोन लाथा मारल्या असत्या’, असं विधान त्याने केलं होतं. ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं. या वक्तव्याचा अभिनेते किरण माने, अभिजीत केळकर यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान अभिजीतच्या पोस्टवर आता अभिनेता शरद पोंक्षे यांनी केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

pushkar jog

अभिनेता अभिजीत केळकरची आई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका होत्या. त्यामुळे त्याने त्याचे अनुभव सांगत पुष्करच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. पुष्करला त्याचे वक्तव्य चूक असल्याची समाज त्याने आपल्या पोस्टमधून दिली होती. या पोस्टवर अभिनेता शरद पोंक्षे यांनी कमेंट करत लिहिलं आहे कि, ‘माझ्या घरीसुद्धा नगरपालिकावाले आले होते. मी त्यांना चहा- पाणी विचारलं व मी ब्राह्मण आहे, मला कसलीच सवलत नको म्हणून नोंदही नको, असं नम्रपणे सांगितलं. त्यावर हसून ते निघून गेले. दरवाजावर कोणीही आलं तरी त्याचा आदर करणं ही आपली संस्कृती आहे. नकारसुद्धा नम्रपणे देता येतो’.

दरम्यान अभिजित केळकरने शरद पोंक्षे यांच्या कमेंटवर प्रतिक्रिया देताना, ‘नेमका माझा मुद्दा हाच आहे’ असे लिहिले आहे. पुष्करच्या पोस्टविषयी बोलायचे झाले तर यातील विधानांमूळे मोठा वाद निर्माण झाला. त्यामुळे सोमवारी रात्री पुष्करने नवी पोस्ट शेअर करून दिलगिरी व्यक्त केली. त्याने म्हटले, ‘मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो’.