त्याने प्रपोज केलं.. तिने ‘हो’ म्हटलं!! ‘हा’ आहे अंजीचा खऱ्या आयुष्यातला पश्या; अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील कौटुंबिक मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. यावेळी मालिकेतील कलाकार आणि मालिकेचा प्रेक्षकवर्ग भावुक झाला होता. दरम्यान या मालिकेतील अंजी आणि पश्या ही मुख्य पात्रं कायम चर्चेत असायची. दोघेही प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा आणि कुटुंबाचा एक अविभाज्य भाग झाली होती. दरम्यान अंजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोमल कुंभारने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना आनंदाचा सुखद धक्का दिला आहे.

अभिनेत्री कोमल कुंभारचा २ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता आणि तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडीओ तिने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत खास गोष्ट अशी आहे कि, कोमलचा बॉयफ्रेंड गोकुळ दशवंतने तिला प्रपोज केल्याचं दिसत आहे. गोकुळने कोमलच्या वाढदिवसानिमित्त तिला सरप्राईज देण्यासाठी सर्व सजावट केली होती. इतकेच नव्हे तर चक्क गुडघ्यावर बसून तिला प्रपोज केलं. मग काय कोमलनेही होकार दिला आणि गोकुळने तिला अंगठी घातली. हा क्षण कोमल आणि गोकुळसाठी अत्यंत खास आणि आनंदाचा क्षण ठरला.

हा व्हिडीओ शेअर करताना कोमलने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘तुम्ही खास आहात, याची जाणीव करून देण्यासाठी एखादी व्यक्ती जेव्हा प्रयत्न करते ती भावना खूप अद्भूत असते. खूप खूप धन्यवाद प्रिय गोकुळ दशवंत, तू मला दिलेले हे सर्वोत्तम सरप्राईज होते’. या व्हिडीओत बेटर टुगेदर असेही तिने लिहिले आहे. शिवाय कोमल आणि गोकुळ यांचे फोटोसुद्धा यात दिसत आहेत. केकजवळ ठेवलेल्या बोर्डावर ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको’, असं लिहिलेलं दिसत आहे. माहितीनुसार, कोमल कुंभारचा जोडीदार गोकुळ दशवंत हादेखील कलाविश्वात कार्यरत आहे. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक म्हणून त्याने विविध प्रोजेक्ट्ससाठी काम पाहिले आहे.