‘कपाळी कुंकवाचा टिळा अन..’; ‘धर्मवीर 2’मध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा फर्स्ट लूक आऊट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ठाण्यातील शिवसेनेचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेल्या दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिस प्रचंड गाजवला. गतवर्षी या चित्रपटाची सर्वाधिक चर्चा रंगली. यानंतर आता ‘धर्मवीर २’ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता बळावली आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरु असून सेटवरून काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता क्षितीश दातेच्या भूमिकेचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक हा आनंद दिघे यांची भूमिका साकारतो आहे. तर अभिनेता क्षितीश दातेने या चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच क्षितीशने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरून एकनाथ शिंदेंच्या गेटअपमधील एक ब्लर फोटो शेअर केला आहे.

अभिनेता क्षितीश दातेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवरून एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरीही त्याच्या कपाळावरचा कुंकवाचा लाल टिळा आणि वाढलेली दाढी- मिशी पहायला मिळत आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे कि, ‘मुक्काम पोस्ट ठाणे’. ‘धर्मवीर’मध्येही त्याने एकनाथ शिंदेंची भूमिका साकारली होती. त्याच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी आणि दिग्गज मंडळींनी कौतुकाचा वर्षाव केला होता. दरम्यान ‘धर्मवीर २’मध्ये हिंदुत्वावर भाष्य केले जाणार असून या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण तरडे करत आहेत आणि निर्मिती मंगेश देसाई करत आहेत.