हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक ४ मे रोजी मणिपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यात दोन आदिवासी जमातीतील असहाय महिलांची निर्वस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ तब्बल ७७ दिवसांनी समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. सध्या सर्व स्तरांवरून या घटनेचा निषेध केला जात आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर मनोरंजन विश्वातूनही संताप व्यक्त केला जात आहे. नुकतीच अभिनेता कुशल बद्रिकेनेदेखील एक पोस्ट शेअर करत या घटनेचा निषेध केला आहे.
अभिनेता कुशल बद्रिके याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये या घृणास्पद कृत्याचा थेट महाभारतातील प्रसंगासोबत संबंध जोडत या घटनेबाबत निषेध जाहीर केला आहे. अभिनेता कुशल बद्रिकेने मणिपूरमधील परिस्थितीवर संताप व्यक्त करताना या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘कौरवांनी द्रौपदीचे कपडे काढले खरे पण, लाज निघाली ती पांडवांची… ध्रुतराष्ट्राच्या नजरेने भरलेल्या ह्या समाजाचा मी सुद्धा एक हिस्सा आहे ह्याची मला प्रचंड कीव येते. मी हात जोडून वाट बघतोय श्री कृष्णाची आता त्याने अवतरण्याची गरज आहे. मी निषेध करतो मणिपुर घटनेचा…’.
कुशल बद्रिकेची हि पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक युजर्स आणि कलाकारांनी विविध प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहलंय, ‘त्या कृष्णाच्या अवतरण्याची वाट बघण्यापेक्षा आता आपल्यातलाचं कुणीतरी कृष्ण होणे गरजेचे आहे… किंबहुना असे कृष्ण तयार करणे गरजेचे आहे… (विवस्त्र धिंड काढण्यात आलेल्या २ महिलांपैकी एका महिलेचा पती कारगिल युद्धासात देशाविरुद्ध लढला होता.) “युद्धात देश वाचवला, पण माझ्या पत्नीची अब्रू नाही वाचवू शकलो” हे त्याचं कालचं विधान.. या विधानाने नकळत २ मुस्काटात ठेवून दिल्यात त्याने आपल्या सर्वांच्या आणि हो या व्यवस्थेच्या सुद्धा… स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी नंतर सुद्धा आपण आपल्या आयाबायांना मोकळीक देऊ शकलो नाहीये! स्वतःला ‘माणूस’ म्हणवून घेण्यास देखील किळस येतेय!’ कुशल व्यतिरिक्त स्वप्नील जोशी, हेमंत ढोमे, सलील कुलकर्णी, रेणुका शहाणे, हेमांगी कवी, अभिज्ञा भावे या कलाकारांनी सुद्धा मणिपूर घटनेसंदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.