‘तुम जैसे बेवडों का सहारा..’ कुशल बद्रिकेची दोस्तीत मस्ती; म्हणाला, ‘हक्काने ज्यांच्याबरोबर.. ‘


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काल जगभरात फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला. कुणी फ्रेंडशिप बँड बांधून हा दिवस आपल्या मित्रांना समर्पित केला. तर काहींनी सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ, आठवणी तसेच किस्से शेअर करत आपल्या मैत्रीतील प्रेम दर्शवले. मित्र हा केवळ एक व्यक्ती नसते तर तो एक जागा असतो जी आपल्यासाठी नेहमी रिकामी असते. इथे येऊन आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो किंवा काहिकदा गरळसुद्धा ओकू शकतो. आपण काहीही बोललो, भांडलो, चिडलो तरी जो मित्र असतो तो प्रत्येक परिस्थितीत यारी निभावतो. अशाच मित्रांसाठी अभिनेता कुशल बद्रिकेने खास पोस्ट शेअर केली होती.

कुशल बद्रिकेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने मस्त आपल्या खास मित्रांचे आणि मित्रांसोबतचे धमाल फोटो, व्हिडीओ एकत्र शेअर केले आहेत. सोबत अतिशय भन्नाट कॅप्शन देत त्याने लिहिलं आहे कि, ‘हक्काने ज्यांच्या बरोबर लढता येतं, आणि उगाच ज्यांच्या वर चढता येत… त्या माझ्या मित्रांना …. Happy friendship day’. या व्हिडीओमध्ये कुशलसोबत अभिनेता संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण आणि दिग्दर्शक विजू माने दिसत आहेत. उदाहरण देता येईल अशी या दोस्तांच्या दोस्तीची चौकट आहे.

कुशलच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांच्या मैत्रीचे कौतुक केले आहे. या व्हिडिओसोबत कुशलने ‘यारों ने मेरे वास्ते..’ हे लोकप्रिय गाणे जोडले आहे. हा व्हिडीओ एकंदरच पाहिल्यावर एक वेगळीच एनर्जी जाणवते आहे. या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने लिहिलंय, ‘तुमची मैत्री अशीच सदैव कायम राहावी आणीअख्या महाराष्ट्राला आपण खळखळून हसवत राहावं ह्या,सर्व महाराष्ट्राच्या वतीनं शुभेच्छ!’ तसेच अनेकांनी या व्हिडिओवर मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी ‘स्ट्रगलर साला’चा आगामी भाग कधी येणार अशी विचारणा केली आहे.