‘तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून..’; आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींसाठी कुशलची खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच. जसा सामान्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टीसाठी हा संघर्ष सुरु असतो तसाच कलाकार मंडळींच्या आयुष्यातही सुरु असतो. ज्याचा संघर्ष त्याच्यासाठी कठीणच. अनेकांना तो व्यक्त करता येतो अनेकांना नाही. तर अभिनेता कुशल बद्रिकेने आज शेअर केलेली सोशल मीडिया पोस्ट याच्याशीच संबंधित आहे. कुशलच्या स्ट्रगलबाबत सगळ्यांनाच माहित आहे. पण या काळात त्याला साथ लाभलेली माणसं फार कमी जणांना ठाऊक आहे. ही खास पोस्ट कुशलने त्या माणसांसाठी केली आहे ज्यांनी केलेल्या मदतीला तो उपकार म्हणू शकत नाही आणि त्यांचे आभार मानायला शब्द अपुरे आहेत.

कुशलने त्याच्या संघर्षाच्या काळात मदत करणाऱ्या आणि त्याच्या आयुष्यात महत्त्वाच्या स्थानी असलणाऱ्या व्यक्तींसाठी हि पोस्ट शेअर करताना लिहिलंय की, ‘आपल्या सगळ्यांचंच आभाळ थोडं थोडं उसवलेलं असतं नाही का कुठून कुठून!! कुठून तरी गळकं, कुठून कोलमडलेलं, अर्धवट वाचलेल्या पुस्तकाच्या एखाद्या पाना सारखं अलगद दुमडलेलं. ह्या आभाळाचं ओझं सांभाळणारे कितीतरी हात आपल्या सोबत असतात, आपण मात्र बऱ्याचदा ते आभाळ “आपल्याच करंगळीवर” पेललय ह्या भ्रमात जगत असतो. कधी कधी जीवनाच्या धुंदीत आभाळ ठेंगणं होत आणि त्याचा तोल सांभाळणारे सगळे हात दिसेनासे होतात’.

‘पण ते असतात, कायम तिथेच असतात. म्हणून तर आपलं आभाळ अजूनही तरंगतय नाहीतर त्याच आभाळाच्या ओझ्याखाली कधीच चिरडले गेलो असतो आपण.
घे सावरुनि “आभाळ” माझे
माझ्या मधले “बाळ” माझे. (सुकून)
सुनयना, विजू दादा, संदीप दादा आणि “अमोल पणशीकर” तुमच्यासारखी माणस आयुष्यात आहेत म्हणून ह्या आभाळाचं अस्तित्व आहे. Thanks giving ची post थोडी उशीरा करतोय .’ कुशलच्या या पोस्टवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलंय, ‘खुपच छान कुशल. अशाच माणसांन मधूनच देवाच खरं दर्शन होतो. तो एकच आहे त्यांनीच तर त्याची करंगळीवर ह्या जगाचा भार पेलला आहे. सोन्याचा आणि तुझा फोटो खुप गोड आहे.’ तर आणखी एकाने लिहिलं, ‘कसलं गोड व्यक्त झालास रे.. विनोदी कलाकार इतके भावनाप्रधान लिहू शकतात…माझे डोळे पाणवले’.