‘एक सेकंदही बोअर होणार नाही…’; ‘आत्मपॅम्फ्लेट’ पाहिल्यानंतर ललित प्रभाकरची प्रतिक्रिया


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। परेश मोकाशी लिखित, आशिष बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र प्रत्यक्षात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद काही मिळाला नाही. गुलशन कुमार, टी. सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित या डार्क कॉमेडी चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे कथानक दर्जेदार असूनही प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यामुळे अभिनेता ललित प्रभाकरने खंत व्यक्त केली आहे.

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. यानंतर आता अभिनेता ललित प्रभाकरने चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल खंत व्यक्त केली आहे. ललितने नुकतंच अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो म्हणाला, ‘मी आताच ‘’आत्मपॅम्फ्लेट’’ हा चित्रपट पाहिला. आशिष बेंडे या माझ्या जवळच्या मित्राने तो दिग्दर्शित केला आहे. पण तो माझा मित्र आहे, म्हणून मी हे लाईव्ह करत नाही. मी बऱ्याच वर्षांनी इतका चांगला चित्रपट पाहिला. या चित्रपटानंतर मी मराठी चित्रपटसृष्टीचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. आशिष हा माझा मित्र आहे. या चित्रपटाचे सर्व राज्यात, परदेशात आणि ठिकठिकाणी कौतुक होतं आहे. हा चित्रपट संपेपर्यंत आम्ही तो पाहिला. त्यावेळी आम्ही हसलो, एन्जॉय करत होतो. त्यामुळे तुम्ही आवर्जुन हा चित्रपट बघा’.

https://www.instagram.com/p/CyJPlKKRjhH/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

‘आपल्याकडे मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तितका खर्च केला जात नाही. त्यासाठी बजेट मिळत नाही. त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की, आपल्याला एखादी गोष्ट जर आवडली असेल तर ती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने पाहिलाच पाहिजे. त्यामुळे कृपया हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहा. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला एक पैशाचा पश्चात्ताप होणार नाही. एक सेकंदही बोअर होणार नाही’, असे म्हणत ललित प्रभाकरने हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन केले आहे.