‘आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर गेला ललित प्रभाकर; काय असेल कारण..?


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। देखणेपणाने आणि आपल्या दर्जेदार अभिनयाने तरूणाईत विशेषतः तरूणींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. ललित प्रभाकरने आजपर्यंत अनेक भूमिका साकारल्या. चिं व चि. सौ. का सारख्या चित्रपटातील मस्तीखोर, अतरंगी मुलगा तर आनंदी गोपाळ मधील शिस्तप्रिय, बायकोच्या पाठी खंबीरपणे उभा राहाणारा नवरा. ललितच्या अभिनयाच्या छटा आपण अनेकदा पाहिल्या. आता ललितची आणखी एक नवीन बाजू प्रेक्षकांसमोर आली आहे.

ललित प्रभाकर चक्क परेश मोकाशी लिखित, आशिष बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर पडद्यामागील कलाकारांसोबत त्यांना मदत करताना दिसला. आता त्याने हे असे का केले याचे कारण ललितने स्वतःच सांगितले आहे. ललित प्रभाकर म्हणतो, ‘आशिष माझा खूप जवळचा मित्र आहे आणि त्याच्या पहिल्या चित्रपटाचा मला भाग व्हायचे होते. आशिष एक व्यक्ती म्हणून तर उत्तम आहेच याशिवाय एक दिग्दर्शक म्हणूनही तो सर्वोत्कृष्ट आहे. त्यामुळे त्याच्या या प्रोजेक्टमध्ये माझा काहीतरी सहभाग असावा, असे मला मनापासून वाटत होते. त्यामुळे मी सेटवर जाऊन त्याला थोडी मदत करण्याचा प्रयत्न केला. हा अनुभव माझ्यासाठीही खूप मस्त होता’.

‘त्यात झी स्टुडिओज, परेश मोकाशी यांच्यासोबतही माझे एक वेगळे नाते आहे. त्यामुळे या प्रोजेक्टच्या निर्मितीमध्ये थोडा फार का होईना, माझा हातभार लागला आणि याचा मला विशेष आनंद आहे. या चित्रपटातील बालकलाकार सगळेच एकदम जबरदस्त आहेत. काय कमाल अभिनय करतात ही मुले. त्यांच्यासोबतही थोडी मजामस्ती केली’. भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल. राय, कनुप्रिया ए. अय्यर, मधुगंधा कुलकर्णी व झी स्टुडिओ प्रस्तुत मयसभा करमणूक मंडळ निर्मित ‘आत्मपॅम्प्लेट’ या या चित्रपटात ओम बेंडखळे , प्रांजली श्रीकांत , भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या ६ ॲाक्टोबर रोजी ‘आत्मपॅम्फ्लेट’ प्रदर्शित होत आहे.